थॉट लिडर्स : नॉम चाम्स्की - 'खराखुरा विचारवंत'

शैलेश पांडे
बुधवार, 22 जानेवारी 2020

ग्लोबल थॉट लिडर्स : नॉम चाम्स्की

"विचारवंत' हे विशेषण आजकाल फार सैलपणे वापरले जात असले तरी खरे विचारवंत स्वतःला कधीही हे बिरूद लावून घेत नाहीत. एकविसाव्या शतकातले जग ज्या माणसांच्या वक्तृत्व आणि कर्तृत्वाने गाजले, त्यात अनेक मोठी नावे आहेत आणि त्यातले जागतिक स्तरावरील प्रमुख नाव आहे नॉम चाम्स्की या नव्वदीपल्याडच्या खऱ्याखुऱ्या विचारवंताचे...!

ग्लोबल थॉट लिडर्स : नॉम चाम्स्की

"विचारवंत' हे विशेषण आजकाल फार सैलपणे वापरले जात असले तरी खरे विचारवंत स्वतःला कधीही हे बिरूद लावून घेत नाहीत. एकविसाव्या शतकातले जग ज्या माणसांच्या वक्तृत्व आणि कर्तृत्वाने गाजले, त्यात अनेक मोठी नावे आहेत आणि त्यातले जागतिक स्तरावरील प्रमुख नाव आहे नॉम चाम्स्की या नव्वदीपल्याडच्या खऱ्याखुऱ्या विचारवंताचे...!

Image result for noam chomsky

मित्रदेशांबरोबरील वाहतूक अधिक सोईस्कर करण्याचा भारताचा नेहमीच प्रयत्न

एखादी गोष्ट समजावून सांगतो तो विश्‍लेषक, एखाद्या गोष्टीचे मूल्यमापन करतो तो टीकाकार किंवा भाष्यकार आणि अगदी नवा विचार सांगतो तो विचारवंत. या अर्थाने सध्याच्या जगात "विचारवंत' म्हणून फार थोडी माणसं जिवंत आहेत. चॉम्स्की त्यातलेच एक. "आय नेव्हर वॉज अवेअर ऑफ एनी अदर ऑप्शन बट टू क्वेश्‍चन एव्हरीथिंग'...असं सतत सांगणारे नॉम चाम्स्की 7 डिसेंबर 2019 रोजी 91 वर्षांचे झाले. प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्‍न विचारण्याखेरीज दुसरा पर्याय मला कधीही दिसला नाही, अशी भूमिका घेणाऱ्या या वादग्रस्त विद्वानानं सातत्यानं प्रश्‍न विचारले. अमेरिकन सत्तेला, भांडवलशहांना आणि साम्राज्यवादी मानसिकतेला. ते आजही प्रश्‍न विचारतात, इशारेही देतात. भाष्य करतात आणि भविष्यातल्या संकटांबाबत आपल्याला जागेही करतात.

जागतिक पातळीवर ज्यांचे संदर्भ दिले जातात, अशा शेक्‍सपीअर, मार्क्‍स, प्लेटो, फ्रॉईड अशा प्रभावळीत शोभेल असा हा भाषाशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, विचारवंत, इतिहासकार आणि बोध विज्ञान तज्ज्ञ (कॉग्निटिव्ह सायंटिस्ट). सध्याच्या "ग्लोबल' विचारविश्‍वात सर्वाधिक प्रभाव असेल तर तो नॉम चाम्स्की यांचा आहे. देश भौतिक प्रगतीने सुखी होतो आणि वैचारिक प्रगतीने उन्नत होतो, असे मानणाऱ्यांच्या मांदियाळीतले हे नाव. गेली किमान सत्तर वर्षे त्या-त्या वेळच्या सामाजिक, आर्थिक प्रश्‍नांच्या संदर्भात प्रश्‍न उपस्थित करूनही लोकप्रिय ठरलेले. निक्‍सन हा एकमेव अपवाद. व्हिएतनाम युद्धातील अमेरिकेच्या सहभागाबद्दल "ही साम्राज्यशाही नव्हे काय?' असा थेट प्रश्‍न विचारल्यामुळे तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्‍सन यांनी चॉम्स्की यांना चक्क शत्रुपक्षाच्या यादीत टाकले होते. एरवीही इतर राज्यकर्त्यांना हा माणूस आवडला नसेल कदाचित. पण, तेवढ्यासाठी तो सर्वांचा शत्रू ठरला नाही. तो अमेरिकेचा आणि समस्त मानवतेचा मित्र-मार्गदर्शक ठरला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image result for noam chomsky

अमेरिकेचे परराष्ट्र धोरण, भांडवलशाही, मुख्य प्रवाहातील माध्यमे हे त्यांच्या टीकेचे विषय. भाषाशास्त्र, युद्ध आणि राजकारण हे व्यासंगाचे-अभ्यासाचे विषय. आधुनिक भाषाशास्त्राचा जनक असे त्यांना संबोधले जाते ते त्यांच्या संशोधनासाठी. भाषेची संरचनात्मक तत्त्वे मानवी मनात जीवशास्त्रीयदृष्ट्या आधीच अस्तित्वात असतात, असा सिद्धांत मांडून त्यांनी "जन्मतः माणूस भाषेच्या दृष्टीने शून्य असतो', या पारंपरिक गृहितकाला छेद दिला. वयाच्या दहाव्या वर्षी चॉम्स्की यांनी युरोपातील वाढत्या फॅसिझ्मच्या संदर्भात लेख लिहिला होता यावरून त्यांची बौद्धिक झेप लक्षात यावी. त्यांची हीच ताकद त्यांना एकमेकांशी वरकरणी काहीही संबंध नसलेल्या विचार-विषयांमध्ये लिलया विहार करण्यासाठी सहाय्यक ठरली. त्याम्‌ुळेच एकीकडे हा माणूस भाषाशास्त्रात संशोधन करतो आणि त्याचवेळी युद्धखोरीवर बोलतो. बोध किंवा संज्ञानात्मक विज्ञानातील अगदी नव्या संकल्पनांची मांडणी करतो आणि त्याचवेळी कष्टकऱ्यांनी स्वतःच संपूर्ण व्यवस्था चालवायला घेतली पाहिजे, अशा क्रांतिकारी मताचे प्रतिपादनही करतो.

भाषाशास्त्रात पीएच. डी. केलेल्या या माणसावर कित्येक वर्षे नजर ठेवण्याची गरज सीआयएला पडली यावरून त्याचे अमेरिकेच्या सामाजिक व राजकीय जीवनातील महत्त्व (राज्यकर्त्यांच्या लेखी ते उपद्रवमूल्य असू शकते) लक्षात यावे.

Image result for noam chomsky

भारताच्या संदर्भात चॉम्स्कींचे महत्त्व भाषाशास्त्र किंवा युद्धखोरीहून अधिक "सहमतीच्या उत्पादना"च्या ("मॅन्युफॅक्‍चरिंग कन्सेंटः द पोलिटिकल इकॉनॉमी ऑफ मास मीडिया' या नावाचे पुस्तक एडवर्ड हर्मन आणि चॉम्स्की या जोडीने 1988 मध्ये प्रसिद्ध केले) मुद्याच्या संदर्भात समजून घेतले पाहिजे. हा ग्रंथ 1988 मध्ये आला असला तरी त्यापूर्वी किती तरी काळ हा विषय चर्चेत होता. त्यानंतर त्या तत्त्वाची काही प्रात्यक्षिके जगात ठिकठिकाणी झाली. आता तर ती दररोजच होत आहेत. असहमतीविना लोकशाही असू शकत नाही, हा विचार सर्वमान्य असला तरी "असहमती म्हणजे विरोध आणि विरोध नसेल तरच ती (बहुमताची) लोकशाही', अशी (विचित्र) "उत्क्रांती' गत काही काळात भारतीय समाजकारण व राजकारणात साधली गेली आहे.

'क्रिस्टल' पुरस्कार मिळवणारी दीपिका ठरली एकमेव भारतीय अभिनेत्री !

तुम्ही सहमत होत नसाल तर आम्ही तुम्हाला सहमत करून घेऊ किंवा एक तर तुम्ही सहमत व्हाल किंवा अस्तित्वहीन व्हाल, अशा दोनच मार्गांवर ही वाटचाल सुरू आहे. राज्यकर्त्यांना प्रश्‍न विचारणे पाप असल्याच्या थाटात वावरणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. प्रचार तंत्र व माध्यमांचा वापर करून सहमतीचे उत्पादन केले जाऊ शकते, असा या पुस्तकाचा आशय. बहुतांशी टीव्ही चॅनेल्सकडे जरा डोळसपणे पाहिले तर आपल्या नकळत राज्यकर्त्यांशी आपण सहमत होऊ अशा पद्धतीचा कंटेंट पद्धतशीरपणे आपल्या डोक्‍यात शिरवला जात आहे, याचा अंदाज कोणत्याही सुजाण माणसाला येईल. प्रश्‍न विचारण्याची मुभा बाजूला ठेवून फक्त श्रद्धेचा-विश्‍वासाचा भाव निर्माण करायचा म्हणजे चिकित्सेचा प्रश्‍न उद्‌भवत नाही, हे यामागचे मानसशास्त्र.

Image result for noam chomsky

श्रद्धा आणि चिकित्सेचे कधीच जमत नाही. चॉम्स्की नेमके यावर बोट ठेवतात. डोनाल्ड ट्रंप अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर चाम्स्की यांनी त्यांच्यावर टीका केली. त्यांच्या पर्यावरणविषयक धोरणावर, भूमिकेवर टीका केली. त्यांना तिकडे कुणी अमेरिका सोडून जाण्याचा सल्ला दिला होता काय, याबद्दल कधीच काही वाचनात आले नाही. पण, कुणाच्या लेखी उदारमतवादी तर कुणाच्या दृष्टीने क्रांतिकारी असलेला हा माणूस मानवी समाजाचे व स्थितीचे मूल्यमापन किती चिकित्सकपणे आणि सहृदयतेने करतो हे आपण समजून घेतले पाहिजे. मानवी अस्तित्वावर अणुयुद्ध, पर्यावरण ऱ्हासाचे संकट आणि लोकशाही व्यवस्थांच्या अस्तित्वाला नख लावण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न अशी तीन संकटे घोंघावत आहेत, असा इशारा देऊन हा माणूस कधीचाच मोकळा झाला आहे. लोकतंत्राच्या बचावासाठी त्यांनी जगातल्या तरुणाईला साद घातली आहे.

Image result for noam chomsky

लोकशाही आणि स्वातंत्र्य या दोनच गोष्टी आपल्या अस्तित्वाला पूरक ठरू शकतात, याकडे त्यांनी साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. जगभरात युद्धखोरी, पर्यावरणाबद्दलचा बेमूर्वत दृष्टीकोन आणि लोकशाही मूल्यांबद्दलची बेदरकारी यांची चलती असतानाच्या काळात हा आवाज तसा क्षीण आहे. पण, तो महत्त्वाचा आहे. मंदिरे, पुतळे, पुराण व इतिहासपुरुषांची चरित्रे, शहरांची नावे अशा साऱ्या अस्मितांच्या प्रश्‍नांवर साऱ्या देशाची मानसिकता हिंदोळे खात असताना भविष्याबद्दलच्या अशा विवेकाच्या अभावाची सल दिसतेय का कुठे कुणाला?

(वरील लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special article on Noam Chomsky by Shailesh Pande in thought leaders column