विशेष : ‘ल्युडो’, थ्री डी बाहुली आणि शब्दभ्रम!

ludo-movie
ludo-movie

अनुराग बसू यांच्या ‘ल्युडो’ या चित्रपटात आदित्य रॉय कपूरला शब्दभ्रम करणारा स्टॅंडअप कॉमेडियन दाखवण्यात आलं आहे. स्वतःला न बोलता येणारी वाक्यं तो आपल्याच बाहुल्याच्या माध्यमातून सांगतो, असा हा भन्नाट प्रकार होता. विशेष म्हणजे, हुबेहूब आदित्यसारखी दिसणारी ही बाहुली महाराष्ट्राचे सुपुत्र, शब्दभ्रमकार रामदास पाध्ये व त्यांचा मुलगा सत्यजित या दोघांनी बनवली आहे.

स्टॅंडअप कॉमेडी हा आजच्या तरुणाईचा सर्वाधिक लाडका विषय. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या प्रसंगांना, घडामोडींना अगदी थेट व तुफान विनोदी पद्धतीनं हात घालणारे विषय, त्याची भन्नाट मांडणी आणि प्रेक्षकांना त्यात सामावून घेण्याच्या हातोटीमुळं हा प्रकार तुफान लोकप्रिय झाला आहे. एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वोत्कृष्ट स्टॅंडअप कॉमेडियन शोधण्यासाठीची स्पर्धाही भरवली गेली. स्टॅंडअप कॉमेडीतील अनेक कलाकार चित्रपटांतही दिसू लागले आहेत. हा लोकप्रिय प्रकार आता हिंदी चित्रपटांचाही भाग होतो आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अनुराग बसू यांच्या ‘ल्युडो’ या चित्रपटात आदित्य रॉय कपूरला शब्दभ्रम करणारा स्टॅंडअप कॉमेडियन दाखवण्यात आलं आहे. स्वःतला न बोलता येणारी वाक्यं तो बाहुल्याच्या माध्यमातून सांगतो, असा हा भन्नाट प्रकार होता. ही बाहुली शब्दभ्रमकार रामदास पाध्ये व त्यांचा मुलगा सत्यजित या दोघांनी बनवली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘ल्युडो’मध्ये आदित्य बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून स्टॅंडअप कॉमेडी करणारा कलाकार दाखवला आहे. आदित्य हुबेहूब त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या या बाहुलीच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील व्यथा, समस्या, गमती मांडत प्रेक्षकांचं मनोरंजन करीत असतो. ही बाहुली रामदास पाध्ये व सत्यजितनं थ्री डी प्रिंटिंग प्रणालीच्या मदतीनं बनवली आहे. याविषयी शब्दभ्रमकार रामदास पाध्ये सांगतात, ‘‘अनुराग बसूला आम्ही हुबेहूब दिसणाऱ्या बाहुल्या बनवू शकतो, याविषयी माहिती होती. आम्ही त्यांना आमच्या संग्रहातील बाहुल्या दाखवल्यावर ते त्यांतील बारकावे पाहून चकित झाले. आम्हाला या चित्रपटात आदित्य रॉय कपूरची बाहुली शब्दभ्रमाच्या माध्यमातून मांडण्याची संधी मिळाली.’’ बोलक्या बाहुल्यांच्या कलेत ५३ वर्षांचा गाढा अनुभव असलेल्या रामदास पाध्येंच्या संग्रही २ हजार २०० पेक्षा अधिक बाहुल्या आहेत. वडिलांप्रमाणेच सत्यजित पाध्ये ‘इंडियाज् गॉट टॅलेंट’, ‘केबीसी’, ‘बिग बॉस’ अशा लोकप्रिय शोमध्येही दिसले आहेत.

या चित्रपटातील अनुभवासंदर्भात सत्यजित म्हणतो, ‘‘आदित्यची थ्री डी बाहुली बनवताना आम्ही त्याचा थ्री डी स्कॅन केला, त्यानंतर थ्री डी फोटो काढले. त्यानुसार आम्ही फायनल थ्री डी प्रिंटेंड बाहुली तयार केली. त्याची हेयरस्टाईल आणि चेहऱ्यावरचं लांबसडक नाक, ही बाहुलीची वैशिष्ट्ये ठरली. तोंडाची ठेवण, भुवया आणि पापण्या यांची हालचाल, हे मोठं आव्हान होतं. इथं माझ्या वडिलांचा अनुभव कामाला आला व त्यानुसार मी आदित्यला ट्रेनिंग दिलं.’’ ट्रेनिंगच्या अनुभवाविषयी सत्यजित सांगतात, ‘‘आदित्य मन लावून ही कला आत्मसात करण्यामध्ये लक्ष द्यायचा. शब्दभ्रमकार बनण्याचं तंत्रशुद्ध शिक्षण आदित्यनं खूप लवकर आत्मसात केलं. आदित्यनं अनेक बारकाव्यांसह ही भूमिका चांगली वठवली आहे.’’

या अनुभवाविषयी आदित्य रॉय कपूर म्हणतो, ‘‘माझ्या भूमिकेच्या तयारीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल सत्यजितचे आभार. आपल्याकडून ही सुंदर कला शिकणं हा एक अद्‌भुत अनुभव होता. आपल्या वडिलांनाही माझा परफॉर्मन्स आवडेल, अशी आशा आहे.’’

एकंदरीतच, हिंदी चित्रपटात स्टॅंडअप कॉमेडी आणि शब्दभ्रमासारखे विषय कथेचा भाग बनत आहेत व यात काम करणाऱ्या तरुणाईला भविष्यात मोठी संधी आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com