व्यसनाच्या विनाशकारी वादळापासून तरुणांनी दूर राहावे - कृष्णा यादव
मुंबई, ता. २३: व्यसन हे एखाद्या कॅन्सर पेक्षाही मोठा गंभीर आजार आहे ते एक प्रकारचे विनाशकारी वादळ असते. आज युवा पिढी मोठ्या प्रमाणात या व्यसनाच्या वादळात अडकून पडली आहे. त्यामुळे या विनाशकारी वादळाला रोखण्यासाठी तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन जीवन रेखा प्रतिष्ठानचे प्रमुख व युथ आयकॉन कृष्णा यादव यांनी केले.
यिनच्या अधिवेशनात सेवा या विषयावर यादव यांनी आपले विचार मांडले. यावेळी त्यांनी आपण करत असलेल्या व्यसनमुक्तीच्या सेवाकार्याची सविस्तर माहिती दिली. आपल्या वडिलांनी सुरू केलेला हा वसा आपण कसा जतन करत आहोत, याचे अनेक उदाहरणे देत त्यासाठी येत असलेले संकटे आणि यश यातील अनेक अनुभव त्यांनी सांगितले.
यादव म्हणाले की, व्यसनमुक्ती आणि त्यासंदर्भातील कार्य मी शालेय जीवनातच माझ्या वडिलांपासून पाहिले होते. माझ्या वडिलांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये संस्था सुरू केली होती. लातूरमध्ये अगदी भूत बंगला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका पडक्या इमारतीतील ती सुरू केली होती. मात्र आज या संस्थेने 30 हजाराहून अधिक जणांना व्यसनमुक्ती पासून दूर करत त्यांच्यावर उपचार केले आहेत. त्याचा खूप मोठा आनंद आम्हाला वाटतो. मला व्यसनमुक्तीच्या या कामातून खूप मोठी प्रेरणा मिळत असते. त्यामुळे वडिलांनी सुरू केलेला वारसा मी आता चालवत आहे. माझी खरी प्रेरणा रुग्णांचा मोठा आशीर्वाद असतो. तेच मला प्रेरणा देत राहतात. व्यसन हे एक दिवसात सुटत नाही. अनेकदा व्यसनी लोकांना ऍडमिट करावे लागते. त्यांच्यावर उपचार करावे लागतात. त्यानंतर त्यातून प्रश्न मार्गी लागतो, अशी माहितीही यावेळी यादव यांनी दिली.
जीवन रेखा प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्यसनमुक्ती केंद्राची मोहीम चालवली जाते. त्या माध्यमातून व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना त्यापासून दूर करण्यासाठी उपचार केले जातात. यामुळे हजारो घरांमध्ये आज व्यसनमुक्ती झाली असून त्यामुळे त्या कुटुंबांना त्याचा फायदा होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यिनच्या प्रतिनिधींनी यादव यांना अनेक प्रश्न उपस्थित करून याविषयीची अधीकची माहिती जाणून घेतली. तसेच आपल्या जिल्ह्यात या संदर्भातील काय उपाययोजना करता येतील, त्यासाठीचे कोणते प्रशिक्षण मिळेल काय असे प्रश्नही उपस्थित केले. त्यावर यादव यांनी व्यसन हे खरंतर एक विनाशकारी वादळ आहे. या वादळाला रोखण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान देण्याची गरज आहे. व्यसनाला कोणतेही वय लागू होत नाही. हे कधीही लागू शकते . त्यामुळे तरुणांनी कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये, एकदा व्यसन लागल्यास त्यातून बाहेर पडणे अवघड असते, त्यामुळे त्यापासून दूर राहा असे आवाहन यादव यांनी यावेळी केले. तसेच अलीकडे मुलींमध्ये व्यसनाची संख्या वाढत असल्याने त्याविषयीची चिंता त्यांनी व्यक्त केली.