उद्योजकांचा महाराष्ट्र निर्माण होईल यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा ; बिपिन जगताप
मुंबई, ता. २२: राज्यात शेतीपूरक क्षेत्रात उद्योजक होण्याच्या खूप संधी असल्याने तरुणांनी उद्योगाकडे वळले पाहिजे. या माध्यमातून एक उद्योजकाची चळवळ आणि त्यातून उद्योजकांचा एक नवा महाराष्ट्र निर्माण होईल, यासाठी प्रत्येक तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्य खादी व ग्रामउद्योग विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी आज यिनच्या अधिवेशनात केले.
"गोडवा जगण्यातला" या विषयावर त्यांनी आज यीनच्या अधिवेशनात आपले विचार मांडत मधमाशी पालन, मध उत्पादन आणि मधु पर्यटन आदी विषयावर सविस्तर माहिती दिली. तसेच त्यासाठीच्या असलेल्या योजना आदींची माहिती देत तरुणांना या क्षेत्राकडे कसे येता येईल याचे मार्ग सांगितले.
जगताप म्हणाले की, माणसाने निसर्गातील प्रत्येक गोष्टींकडून शिकले पाहिजे. मधमाशा हजारो फुलांवर काम करतात. परंतु त्या कधीही चावत नाहीत. जगात सर्वात मोठा आणि सहज करता येईल असा व्यवसाय हा मधमाशांचा आहे. मधमाशा करत असलेले नियोजन, त्यांची स्वच्छता त्यांचे घरे बांधण्याची कला अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकल्या पाहिजे. मधमाशांच्या घरामध्ये कायमच वातावरण कोणत्याही ऋतूत योग्य पद्धतीने ठेवण्याची कला त्यांच्याकडे आहे. त्या स्वतःहून नियोजन करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून शिकण्याची गरज असल्याचेही जगताप म्हणाले.

Bipin Jagtap
आज आपल्या ताटातील 70 टक्के अन्न हे मधमाशामुळे मिळते. मधुपक्षिका पालन हा जगातील सर्वात मोठा उद्योग आहे. या उद्योगाला कच्चामाल आदी काही लागत नाही. मात्र जेवढे उत्पादन होते तितकेच मागणीही असते. विशेषत: हा उद्योग स्पर्धा नसलेला उद्योग असल्याने तरुणांना या क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात आपले करिअर करण्याची संधी आहे. जे विद्यार्थी कृषी आदी क्षेत्रातील शिक्षण घेतात अशा विद्यार्थ्यांना मधमाशी पालन या क्षेत्राकडे येण्याची गरज जगताप यांनी यावेळी व्यक्त केली.
खादी ग्रामोद्योग आदींकडून जिल्हास्तरावर तरुणांना उद्योजक व्हावे, म्हणून जनजागृती केली जाते. त्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे अशा प्रशिक्षणाच्या माध्यमातून तरुणांना उद्योजक बनण्याची संधी उपलब्ध होते, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो. या संघर्षातूनच आपल्याला यश मिळते.कोणताही व्यवसाय करताना तन आणि मनाची एकाग्रता महत्त्वाचे असते. त्यातूनच एक सौंदर्य निर्माण होते. मधमाशी पालन आणि शेतीपूरक संबंधित उद्योगांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तरुणांना उद्योजक होण्याच्या संधी आहेत. त्यामुळे तरुणाने कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकरी पूरक व्यवसायाकडे वळले पाहिजे. हे करत असताना मधमाशा कशा जिवंत राहतील, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, शासनाच्या विविध योजना शेतकरी घटकांपर्यंत पोचविणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
उद्योग व्यवसायासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या नावाने रोजगार निर्मिती व प्रक्रिया उद्योगासाठी असलेल्या योजनांच्या माध्यमातूनही तरुणांना उद्योजक बनता येते. मात्र या क्षेत्राकडे वळताना वेगळ्या दृष्टिकोनाकडून उद्योगाकडे बघितले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.