संतोष कानडे
OTP Delivery Ujjwala: देशात एलपीजी ग्राहकांच्या संख्येत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. १० वर्षांत पहिल्यांदाच अशी घसरण पाहायला मिळतेय. या घटीमागे कडक ई-केवायसी आणि ओटीपी आधारित सिलिंडर डिलिव्हरी ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. ज्यामुळे बनावट आणि दुबार कनेक्शन्स शोधून काढण्यास मदत होतोय.
चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सुमारे ७५ लाख एलपीजी ग्राहक कमी झाले आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांची संख्या अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात का कमी झाली, हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कडक पडताळणी प्रक्रियेमुळे १० वर्षांत पहिल्यांदाच ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे. यामागील पहिले प्रमुख कारण म्हणजे सरकारने घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी गॅस कनेक्शनचे ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.
एखाद्या ग्राहकाचे ई-केवायसी पूर्ण झाले नसेल, तर सिलिंडरवर मिळणारी सबसिडी बंद होऊ शकते आणि सिलेंडर बुकिंगमध्येही अडचणी येऊ शकतात. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे ओटीपी आधारित सिलेंडर डिलिव्हरी. या प्रक्रियेमुळे बनावट कनेक्शन्स ओळखणे आणि त्यांना आळा घालणे अधिक सोपे झाले आहे. या दोन प्रमुख कारणांमुळे एलपीजी सिलेंडर ग्राहकांची संख्या कमी झाली आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सुमारे ७५ लाख ग्राहक कमी झाले असून यामध्ये जवळपास ६० हजार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. मध्य पूर्वेतील तणावाचा परिणामही एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर झाला आहे.