सकाळ वृत्तसेवा
१८५७ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेला पहिला सशस्त्र उठाव मेरठपासून सुरू होऊन उत्तर, पूर्व व मध्य भारतात पसरला. राणी लक्ष्मीबाई, बहादुरशाह जफर, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे आणि मंगल पांडे हे प्रमुख नेते होते. इंग्रजांचा विजय झाला, पण यामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीची सुरुवात झाली.
२८ डिसेंबर १८८५ रोजी ए.ओ. ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांच्या पुढाकाराने मुंबईतील तेजपाल संस्कृत पाठशाळेत ७२ प्रतिनिधी एकत्र आले आणि 'इंडियन नॅशनल काँग्रेस'ची स्थापना झाली. या स्थापनेमुळे स्वातंत्र्याच्या लढ्याला संघटित आणि दिशा देणारे व्यासपीठ मिळाले.
१९ जुलै १९०५ रोजी लॉर्ड कर्झनने हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याच्या उद्देशाने बंगालची फाळणी जाहीर केली. याच्या विरोधात लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल आणि लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली वंग-भंग आंदोलन झाले. बंकिमचंद्र बॅनर्जी यांचे वंदे मातरम गीत चळवळीचे प्रतीक ठरले. अखेर १२ डिसेंबर १९११ रोजी सम्राट पंचम जॉर्ज यांनी फाळणी रद्द केली.
इ.स. १९१५ मध्ये गांधीजी भारतात परतले आणि गोपाळ कृष्ण गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय राजकारणाशी जोडले गेले. १९२० मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर त्यांनी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले आणि अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक चळवळींचे नेतृत्व केले.
बंगालच्या फाळणीनंतर देशभरात इंग्रजांविरुद्ध आंदोलन सुरू झाले. १३ एप्रिल १९१९ रोजी जनरल डायरने अमृतसरच्या जालियनवाला बागेत निशस्त्र सभा होत असताना लष्कराला १,६०० फैरी झाडण्याचा आदेश दिला. यात स्त्रिया, पुरुष आणि मुलांसह शेकडो जण ठार झाले.
पहिल्या महायुद्धानंतर तुर्कीस्थानच्या अपमानामुळे भारतातील मुस्लिमांनी इंग्रजांविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. गांधीजींनी मुस्लिम ऐक्य आणि असहकार चळवळीसाठी पाठिंबा दिला आणि २४ नोव्हेंबर १९१९ रोजी दिल्लीत 'अखिल भारतीय खिलाफत काँफरन्स' आयोजित केली. या चळवळीमुळे देशभरातील नागरिक एकत्र आले.
८ एप्रिल १९२९ रोजी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्ली विधानसभा परिसरात बॉम्ब फेकले व 'इन्कलाब जिंदाबाद' घोषणांसह इंग्रजांच्या कायद्याचा निषेध केला. या स्फोटात काही जखमी झाले, पण मृत्यू झाला नाही. त्यांनी ही कृती नियोजित असल्याचे जाहीर करून स्वतः पोलिसांना समर्पित केले.
महात्मा गांधींनी ब्रिटीश सरकारकडे ११ मागण्या मांडल्या, पण सरकारने दुर्लक्ष केले. प्रत्युत्तर म्हणून १४ फेब्रुवारी १९३० रोजी गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग सुरू झाला, ज्यातून मिठा सत्याग्रह, विदेशी माल बहिष्कार, करबंदी आणि शिक्षणसंस्थांवर बहिष्कार झाले.
आझाद हिंद फौज ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांशी लढण्यासाठी निर्माण केलेली भारताची सेना होती. तिचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केले होते. रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली. आझाद हिंद सेनेची स्थापना १९४२ मध्ये झाली. हिचे कार्य सप्टेंबर १९४५ पर्यंत सुरू होते.
चले जाव चळवळ (भारत छोडो आंदोलन/ऑगस्ट क्रांती) ऑगस्ट १९४२ मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सुरू झाले. गांधीजींच्या 'करा किंवा मरा' संदेशाने ८ ऑगस्ट रोजी मुंबईत ब्रिटीशांविरुद्ध भारत छोडोचा नारा दिला. या आंदोलनात देशभरात ९ लाख लोकांनी स्वतःला अटक करवून मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.
भगतसिहांनी तुरूंगात लिहलेलं साहित्य बाहेर कसं आलं? 'या' महिलेमुळे जपले गेले क्रांतिकारक विचार