Anushka Tapshalkar
भारतात अनेक महिलांनी समाजाच्या मर्यादा मोडून नवी वाट निर्माण केली. या दहा स्त्रियांनी विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देऊन आपली ओळख निर्माण केली.
रझिया सुलतान या दिल्ली सल्तनतच्या पहिल्या आणि एकमेव महिला सुलतान होत्या. 1236 ते 1240 दरम्यान त्यांनी कुशल प्रशासन, लष्करी नेतृत्व आणि लोकहितकारी कार्याने इतिहासात स्थान मिळवले.
डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी या 1927 मध्ये मद्रास विधीमंडळाच्या पहिल्या महिला सदस्य झाल्या. त्या मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. त्यांनी देवदासी प्रथा बंदी कायद्यासाठी योगदान दिले आणि अड्यार कर्करोग संस्था स्थापन केली.
राजकुमारी अमृत कौर या भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय मंत्री होत्या आणि 1947 ते 1957 दरम्यान आरोग्यमंत्री होत्या. गांधीजींच्या निकटवर्तीय असलेल्या कौर यांनी AIIMSची स्थापना आणि राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन कार्यक्रम सुरू केला.
'भारताची नाइटिंगेल' किंवा 'भारतीय कोकिळा' सरोजिनी नायडू 1947 मध्ये उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल झाल्या. स्वातंत्र्यसैनिक, कवयित्री आणि समाजसुधारक म्हणून त्यांनी नागरी हक्क, महिला सबलीकरण आणि ब्रिटिश विरोधात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
1951 मध्ये अॅना राजम मल्होत्रा या IASमध्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. त्यांनी मुंबईतील पहिल्या संगणकीकृत कंटेनर बंदराच्या स्थापनेत आणि प्रशासकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
विजया लक्ष्मी पंडित 1953 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. कुशल राजनैतिक नेत्या म्हणून त्यांनी भारताचे अमेरिका, ब्रिटन आणि सोव्हिएत संघातील राजदूतपदही भूषवले.
सुचेता कृपलानी या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वपूर्ण नेता होत्या आणि 1963 मध्ये उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या. त्यांनी महिला शिक्षण आणि हक्कांसाठी प्रयत्न करून प्रयागराजमध्ये महिला आश्रमाची स्थापना केली.
किरण बेदी या 1972 मध्ये IPS मध्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. तिहार तुरुंग सुधारणा, वाहतूक व्यवस्थापन आणि ड्रग्स विरोधी मोहिमांसाठी त्यांना 1994 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला.
1992 मध्ये रोज मिलियन बॅथ्यू या UPSCच्या पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या. त्यांनी परीक्षांचे मूल्यांकन अधिक पारदर्शक केले आणि महिलांच्या सार्वजनिक प्रशासनातील सहभागाला प्रोत्साहन दिले.
कल्पना चावला या अंतराळात जाणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला ठरल्या. 1997 मध्ये कोलंबिया यानातून अंतराळात गेल्या, पण 2003 मध्ये अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कार्याने अनेक भारतीय मुलींना प्रेरणा दिली.