kimaya narayan
भारतीय सिनेविश्वाला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणजे मधुबाला. स्वप्न म्हणण्याचं कारण हेच कि ही सौंदर्यवती फार कमी काळ भारतीय सिनेविश्वाला लाभली.
मधुबाला यांचं मूळ नाव मुमताज जेहेन बेगम देहलवी असं होतं. देहलवी कुटूंबाच्या पाच मुलींपैकी ही मोठी मुलगी.
मधुबाला यांची संपूर्ण कारकीर्द रंगली ती त्यांचे वडील अताउल्ला खां यांच्या करड्या नजरेखालीच. मधुबाला यांचे सगळे व्यवहार आणि निर्णय तेच घ्यायचे. प्रत्येक समारंभात त्यांची मधुबाला यांच्याबरोबर हजेरी असायची.
घरची परिस्थिती गरीब असल्याने अताऊल्ला खान मुंबईला आले आणि त्यांनी मधुबालाला बालकलाकार म्हणून सिनेविश्वात कामाला लावलं. त्यांचं स्क्रीनवरील नाव बेबी मुमताज असं होतं.
मधुबाला यांनी हिरोईन म्हणून पदार्पण केलं ते नील कमल या सिनेमातून. यातील त्यांची भूमिका अनेकांना पसंत पडली.
त्यानंतर मधुबाला बॉलिवूडच्या सुपरस्टार झाल्या. परदेशातही त्यांचं सौंदर्य वाखाणलं गेलं.
इतके चाहते आणि सौंदर्यावर फिदा होणारे असूनही मधुबाला प्रेमात उपेक्षित राहिल्या. दिलीप कुमार यांच्याशी त्यांचं लग्न मोडलं तर किशोर कुमार यांच्याशी लग्न होऊनही त्यांच्यात दुरावा आला.
मधुबाला यांच्या हृदयाला छिद्र होतं पण सुरुवातीच्या काळात त्यांच्या या आजाराकडे दुर्लक्ष करण्यात आलं. नंतर हा त्रास वाढला आणि त्या आजारपणातच त्यांचं निधन झालं.