Shubham Banubakode
आप्पासाहेब भोसले हे नागपूरच्या भोसले घराण्याचे पराक्रमी राजे होते. रघुजी भोसले यांचे धाकटे बंधू व्यंकोजी यांचे चिरंजीव, आप्पासाहेबांनी ब्रिटिशांच्या जाचातून स्वतःची सुटका करून इतिहासात नाव कोरले.
रघुजींच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र परसोजी गादीवर बसले, परंतु आप्पासाहेबच राज्यकारभार सांभाळत. ब्रिटिशांनी तहाद्वारे नागपूर प्रांतावर नियंत्रण मिळवले, आणि आप्पासाहेबांचा अविश्वास वाढत गेला.
१६ डिसेंबर १८१७ रोजी आप्पासाहेबांना ब्रिटिशांच्या स्वाधीन व्हावे लागले. ३० डिसेंबरला सक्करदऱ्याच्या लढाईनंतर भोसल्यांच्या राजवाड्यावर युनियन जॅक चढला, आणि आप्पासाहेब नावापुरतेच राजे राहिले.
बाजीराव पेशव्यांशी संपर्क असल्याचा संशय आल्याने ब्रिटिशांनी आप्पासाहेबांना सीताबर्डी टेकडीजवळच्या रेसिडेन्सीत येण्याचा आदेश दिला. आदेश न मानल्याने त्यांना राजवाड्यातून ओढत बाहेर काढून कैदेत टाकले.
धोका लक्षात येताच ब्रिटिशांनी आप्पासाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांना प्रयाग (आताचे प्रयागराज) येथे हलविण्याचे ठरवले. याचवेळी बाजीराव पेशवे ब्रिटिशांविरुद्ध लढत होते.
१३ मे १८१८ च्या पहाटे, जबलपूरजवळ रायचूर येथे लष्करी ताफ्याचा मुक्काम होता. आप्पासाहेबांनी शिपायाचे कपडे परिधान करून, झोपेचा भास निर्माण करत, शिताफीने ब्रिटिश सैनिकांच्या डोळ्यादेखत सुटका करून घेतली. गंगासिंग नावाचा सरदार घोड्यांसह त्यांची वाट पाहत होता.
आप्पासाहेब महादेवाच्या डोंगरावर निघून गेले. ब्रिटिशांनी कॅप्टन ब्राउनला निष्काळजीपणाचा ठपका ठेवून कैद केले.
डॉ. भा.रा. अंधारे लिखित पुस्तकात हे सर्व संदर्भ आले आहेत.