सकाळ डिजिटल टीम
थोरल्या शाहू महाराजांच्या काळात मराठ्यांनी तंजावर ते पेशावर पर्यंत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. त्यांच्यांच काळात पेशव्यांनीही अनेक ठिकाणी पराक्रम गाजवत मराठा साम्राज्याला वैभव प्राप्त करून दिले होते.
यादरम्यान शाहू महाराजांना वडील छत्रपती संभाजी महाराजांप्रामाणे गोव्यावरही वर्चस्व निर्माण करायचं होतं.
त्यावेळी बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वात वसईच्या किल्ल्यावर हल्ला चढवला, परंतु, पोर्तुगीजांनीही निकराची झुंज दिली. दोन वर्षे ही लढाई कायम राहिली होती.
याच कारणाने बाजीराव पेशव्यांनी गोव्यावर हल्ला चढवायचा असा निर्णय घेत त्यांचे मेव्हणे आणि इचलकरंजीचे जहागीरदार व्यंकटराव घोरपडे यांच्याकडे या मोहिमेची जबाबदारी सोपवली.
व्यंकटराव घोरपडे यांच्याशी पेशव्यांची एकुलती एक बहीण अनुसयाबाई यांचा विवाह झालेला होता. अनुसयाबाईंवर पेशव्यांचा खूप जीव होता. यामुळेच गोव्यावरील हल्ला मोहिम व्यंकटरावांकडे सोपवण्यात आलेली. त्यांच्या सहाय्याला दादाजीराव भावे नवलगुंदकर यांची नेमणूक केली होती.
त्यांच्या मोहिमेसाठी सैन्यात दोन हजार पेंढारी, चार हजार घोडदळ आणि सहा हजार पायदळ होते. हे सैन्य २३ जानेवारी १७३९ मध्ये साष्टीमध्ये पोहचले. तिथून मडगावला सैन्यानं मुख्य तळ केला.
त्यानंतर मराठ्यांच्या सैन्यानं फोंड्यातील मर्दनगड, उसगावमझील गढी, सोधेच्या राजाच्या अमलाखालील सुरे आणि सांग, अंत्रुल महाल हे सर्व काबीज केलं.
यामुळे गोव्यातील पोर्तुगीजांवर दबाव वाढला. यावेळी त्यांना कोणाचीही मदत मिळणार नव्हती. अशावेळी गोव्याचे व्हाईसरॉय कौंट द सांदोमिलने व्यंकटराव यांच्याशी तह करण्याचा निर्णय घेतला. तसं पत्रही ८ मार्च १७३९ ला पाठवण्यात आलं.
याआधीही शाहू महाराजांनी मंत्री नारोराम यांच्यातर्फे करण्यात आलेली तहाची याचना फेटाळली होती. त्यामुळे व्हाइसरॉय व्यंकटराव आणि नवलगुंदकर यांच्याशी प्रतिष्ठीत व्यापाऱ्यांच्या सहाय्याने संबंध जुळविण्याचा प्रयत्न केला.
व्यंकटी कामत या व्यापाऱ्यानं नवलगुंदकर यांना साधारण सत्तर हजार अश्रफी एवढी लाच दिली आणि व्यंकटरावांचे मन वळविण्यास सांगितले. त्यानुसार या दोघांनाही मोठी लाच मिळाली.
त्यामुळे व्यंकटराव आणि नवलगुंदकर यांनी २ मे १७३९ रोजी तहाच्या करारावर स्वाक्षरी केली, परंतु शाहू महाराजांनी मात्र नंतर त्यावर शिक्कामोर्तब केले नाही. तहानुसार मराठ्यांना सात लक्ष रुपये मिळणार होते. यातील एक लक्ष नवलगुंदकर स्वत:ला घेणार होते.
मात्र, या लाचप्रकरणामुळे मराठ्यांची गोवा जिंकण्याची संधी मात्र हुकली होती.
पोर्तुगीज मराठा संबंध स.शं.देसाई