सकाळ डिजिटल टीम
प्राचीन काळापासून अरबी घोड्यांना सर्वोत्कृष्ट मानले जाते. भारताशी अरबांचा प्रमुख व्यापार हा घोड्यांचा असे. निजामशहा व आदिलशहा हे युद्धासाठी घोडे मध्यपूर्वेतून आयात करत असत.
मध्यपूर्वेतून आलेल्या अरबी आणि तुर्की जातीच्या घोड्यांचा संकर होऊन भीमथडी तट्टांची जात निर्माण झाली. हे घोडे वेगवान, ताकदवान आणि काटक होते.
सोळाव्या शतकात पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती आणि इंदापूर भागात हे घोडे मोठ्या प्रमाणावर दिसू लागले. भीमा, नीरा आणि कृष्णा नद्यांचे पाणी त्यांना मानवले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यासाठी भीमथडी तट्टांचा प्रभावी वापर केला. या वेगवान घोड्यांमुळे मराठ्यांची सेना शत्रूवर अचानक हल्ला करून लगेचच गायब होऊ शकत होती.
मराठ्यांच्या घोडदळाने आदिलशाही संपवली आणि मुघलांना सळो की पळो करून सोडले. सह्याद्रीच्या दगडखोऱ्यात भीमथडी तट्टांचे टाप घुमू लागले.
शिवरायांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराजांनीही या घोड्यांच्या पैदाशीवर विशेष लक्ष दिले. मराठा सैन्य अधिक बलवान करण्यासाठी त्यांनी घोडदळाला प्राधान्य दिले.
औरंगजेबाच्या प्रचंड सैन्यावर संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी रात्री-अपरात्री हल्ले चढवले. हे धाडसी पराक्रम वेगवान भीमथडी तट्टांमुळेच शक्य झाले.
बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठा घोडदळाने नर्मदा ओलांडली आणि उत्तरेतही मराठ्यांची दहशत निर्माण केली. शिंदे, होळकर, आणि भोसले घराण्यांनीही घोडदळाचा प्रभाव वाढवला.
मराठ्यांच्या विजयात त्यांच्या घोडदळाचा मोठा वाटा होता. भीमथडी तट्टांमुळेच मराठ्यांनी अटकेपार विजय मिळवला. म्हणूनच, या घोड्यांची कीर्ती 'भीमथडी तट्ट यमुनेचे पाणी पितात' या म्हणीपर्यंत पोहोचली.