Anushka Tapshalkar
हरियाणातील फरिदाबादमध्ये ‘वन भोज’ नावाचं एक खास मड हाऊस चर्चेत आहे. हे घर पर्यावरणपूरक असून, नैसर्गिक साधनांपासून बनवलेलं आहे. रेवती आणि वसंत कामत यांनी ३१ वर्षांपूर्वी हे घर बांधलं होतं.
हे मड हाऊस पिंपळ, कडुलिंब आणि लिंबाच्या झाडांनी वेढलेलं आहे. इथे पक्ष्यांचा किलबिलाट आणि मोराचं नृत्य नेहमी दिसतं. तरीही, घरात शांतता जाणवते.
या घराच्या बांधकामात माती, मुल्तानी माती, हळद आणि जवसाचं तेल वापरलं आहे. सुमारे ८०% साहित्य स्थानिक आहे. भिंती सन-ड्राय मड ब्रिक्स (सूर्यप्रकाशात ३० दिवस वाळवलेल्या विटा) वापरून बनवल्या आहेत. त्यावर शेण, हळद, जवसाचं तेल आणि मुल्तानी मातीचं मिश्रण लावलं आहे.
या घरात महागडं फर्निचर किंवा शोपीस नाहीत. प्रत्येक कोपरा गावाकडच्या आठवणी जागवतो. ड्रॉइंग रूमपासून बेडरूमपर्यंत साधेपणा दिसतो. इथे मोठ्या पलंगांऐवजी जमिनीशी जोडलेली सजावट आहे.
या घरात प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळला आहे. फर्निचर माती, जुनं लाकूड आणि दगडांपासून बनवलं आहे. नैसर्गिक प्रकाश आणि हवा खेळती असल्यामुळे विजेचा वापर कमी होतो. मातीची घरं उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार राहतात.
इथे एक छोटी लायब्ररी आहे, जिथे वाचन आणि गाणी ऐकता येतात. इथे टीव्ही आणि इंटरनेटशिवायही मनोरंजनाचे अनेक पर्याय आहेत.
अशा घरासाठी प्रति स्क्वेअर फूट अंदाजे ₹३५०० खर्च येतो. यात मजुरी, साहित्य, रचना आणि आर्किटेक्चरल डिझाइनचाही समावेश आहे.