Pranali Kodre
२४ ऑगस्ट २०२५ रोजी भारताचा दिग्गज कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
पुजारा भारताचा सर्वोत्तम कसोटीपटूंपैकी एक राहिला. राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर तो भारताचा तिसऱ्या क्रमांकावरील सर्वात भरवशाचा खेळाडू बनला होता. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम केले.
पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये ऑक्टोबर २०१० मध्ये बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले होते. पुजाराला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये फार संधी मिळाली नसली, तरी त्याने कसोटीच त्याची वेगळी ओळख बनवली.
पुजाराने पहिले कसोटी शतक २०१२ मध्ये हैदराबाद कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध केले होते.
त्याने त्याचा १०० वा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २०२३ मध्ये खेळला. त्याने विजयी धावही घेतली. १०० व्या कसोटीत विजयी धाव घेणारा ता पाँटिंगनंतरचा दुसराच फलंदाज ठरला.
पुजाराच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षणांपैकी २०१८-१९ आणि २०२०-२१ चा ऑस्ट्रेलिय दौरा आहे. दोन्ही दौऱ्यात भारताला कसोटी मालिकेत विजय मिळवून देण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला.
त्याने २०१८-१९ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ५२१ धावा ठोकल्या होत्या. २०२१ - २१ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने भारताच्या प्रसिद्ध गॅबा कसोटी विजयावेळी अनेक वेगवान चेंडू अंगावर घेत ५६ धावांची खडतर खेळी केली होती.
पुजाराने भारताव्यतिरिक्त सौराष्ट्र, डर्बीशायर, ससेक्स, यॉर्कशायर, नॉटिंगघमशायर या संघाकडूनही प्रथम श्रेणी सामने खेळले. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स संघांकडून खेळला.
पुजारा एकाच कसोटीत पाचही दिवस फलंदाजी करणारा एम.एल. जयसिंहा आणि रवी शास्त्री यांच्यानंतरचा तिसराच भारतीय. २०१७ मध्ये पावसाचा अडथळा आलेल्या कोलकाता कसोटीत श्रीलंकेविरुद्ध त्याने पाचही दिवस फलंदाजी केली होती.
पुजारा एकाच कसोटी डावात ५०० हून अधिक चेंडूंचा सामना करणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे. त्याने २०१७ साली रांची कसोचीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५२५ चेंडू खेळताना २०२ धावा केल्या होत्या.
पुजाराने २७८ प्रथम श्रेणी सामने खेळताना तब्बल ६६ शतके आणि ८१ अर्धशतकांसह २१३०१ धावा केल्या. यातील १०३ कसोटी सामने त्याने भारतासाठी खेळताना १९ शतकांसह ४३.६० च्या सरासरीने ७१९५ धावा केल्या.
पुजाराने ५ वनडे सामने खेळताना ५१ धावा केल्या. त्याने एकूण १३० लिस्ट ए सामन्यांमध्ये १६ शतकांसह ५७५९ धावा केल्या, तर ७१ टी२० सामन्यांत एका शतकासह १५५६ धावा केल्या. यातील ३० सामने तो आयपीएलमध्ये खेळला, ज्यात त्याने ३९० धावा केल्या.
पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तब्बल १८ द्विशतके केली आहेत. तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके करणाऱ्या जगातील फलंदाजांमध्ये डॉन ब्रॅडमन, वॉली हॅमंड आणि पॅट्सी हेन्ड्रेन यांच्या नंतर चौथ्या क्रमांकावर आहे.
पुजाराने कसोटीत १६२१७ चेंडूंचा सामना केला. भारताकडून सर्वाधिक चेंडू खेळणारा तो पाचवा फलंदाज आहे. त्याच्यापुढे राहुल द्रविड (३११८४), सचिन तेंडुलकर (२९४३७+) व्हीव्हीएस लक्ष्मण (१७७८५) आणि विराट कोहली (१६६०८) आहेत.
पुजारा २००६ सालच्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमधील मालिकावीर ठरला होता. त्याने ६ सामन्यांत ३४९ धावा केल्या होत्या.
पुजाराने कसोटीत ६ वेळा सामनावीर आणि २ वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकला आहे.
पुजारा भारतासाठी शेवटचे २०२३ टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळला.