Pranali Kodre
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील स्वराज्य उभारण्यासाठी अनेकांच्या पराक्रमाचा हातभार लागला. यातीलच एक प्रमुख नाव म्हणजे सरसेनापती श्रीमंत हरजीराजे राजेमहाडिक.
हरजीराजे शिवरायांचे विश्वासू सरदार होते आणि जावई देखील होते. त्यांच्या पूर्वजांनीही मोठे पराक्रम गाजवले होते. हरजीराजे देखील प्रत्येक मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वस्व देत होते.
हरजीराजे यांनी कर्नाटकात गाजवलेल्या कामगिरीमुळे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी जेजूरीगडावर 'राजेशाही' हा किताब देऊ केला होता.
हरजीराजे यांच्याशी १६६८ साली शिवरायांनी आपली मुलगी अंबिकाबाई यांचे लग्न लावून दिले होते. राजगडावर त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता.
हरजीराजे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याशीही आपले इमान राखले. त्यांनी कर्नाटकासह दक्षिण प्रांत औरंगजेबाच्या सैन्यापासून वाचवला होता.
मद्रास, म्हैसूर, बंगळुरू, अर्काट यासह कर्नाटक आणि तामिळनाडू जिंजी किल्ल्याच्या अधिपत्याखाली आणला होता.
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही राजाराम महाराजांनी तामिळनाडूतील जिंजीला राजधानी घोषित करून राज्यकारभार पाहिला होता.
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही औरंगजेबाला दक्षिण प्रांतात येण्यापासून हरजीराजेंनी निकराने लढत रोखले होते. त्यांनी जिंजी परिसर स्वराज्यात राखण्यासाठी अनेक पराक्रम गाजवले.
संभाजी राजे यांनी आपली मुलगी भवानीबाई यांचा विवाह हरजीराजे यांचा मुलगा शंकराजी यांच्याशी करून दिला होता.
पुढे जिंजी येथेच औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान याच्या सैन्याशी लढताना २९ सप्टेंबर १६८९ मध्ये हरजीराजे यांचा मृत्यू झाला.