kimaya narayan
भोसले घराण्याचे वंशज आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान जनतेच्या मनात अढळ आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचे वंशजही अत्यंत हुशार आणि पराक्रमी होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांनी अलागिरी नायकला हरवून 1673मध्ये तंजावरमध्ये स्वराज्याची स्थापना केली. तमिळनाडूच्या तंजावर संस्थानावर मराठ्यांची बराच काळ सत्ता होती.
याच राजघराण्यात जन्माला आले भोसले घराण्यातील अत्यंत बुद्धिमान, कर्तबगार राज्यकर्ते सरफोजीराजे भोसले दुसरे. 24 सप्टेंबर 1773 त्यांचा जन्म झाला. त्यावेळेचे राजे तुळजाजी भोसले यांना वारस नसल्याने सरफोजींना दत्तक घेण्यात आलं.
सरफोजी यांच्या शिक्षणाची जबाबदारी जर्मन रेव्हरंड श्वार्ड्स यांना देण्यात आली. श्वार्ड्स यांना भारतीय संस्कृती आणि इतिहास अवगत होता याशिवाय जर्मन, ग्रीक, इंग्रजी,लॅटिन, संस्कृत, उर्दू या भाषा त्यांना अवगत होत्या. तल्लख सरफोजींनी हे सगळं शिक्षण त्यांच्याकडून शिकून आत्मसात केलं.
श्वार्ड्स यांनी नायक घराण्याच्या सरस्वती वाचनालयाची पुनर्स्थापना करत त्यातील मौलिक ग्रंथांचं व्यवस्थापन केलं. त्यांच्यामुळेच वाचनाची आवड सरफोजींना लागली. त्यांनी त्यांच्या हयातीत 30000 हुन अधिक पुस्तके वाचली.
सरफोजी महाराज हे शस्त्रक्रिया तज्ज्ञही होते. त्या काळी सगळ्यात अवगड असलेली मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ते स्वतः करत. त्यांनी केलेल्या प्रत्येक शस्त्रक्रियेचे फोटो आणि नोंद व्यवस्थित करण्यात आली आहे.
त्यांनी वाचनालयासाठी 4000 पुस्तकांची खरेदी केली. याचा वापर त्यांनी जनतेला शिक्षण देण्यासाठी केला.
नृत्य, नाटक, साहित्य, संगीत यातही सरफोजी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. सरफोजीराजे यांनी पहिला देवनागरी छापखाना सुरु केला. इसवी सन 1803 मध्ये तंजावरच्या बृहनेश्वर मंदिरात त्यांनी भोसले घराण्याचा इतिहास कोरून घेतला आणि हे शिल्प आजही अस्तित्वात आहे.