सकाळ डिजिटल टीम
वजन कमी करणे, पचन सुधारणे आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी चिया बियाण्यांचा वापर सध्या मोठ्या प्रमाणावर होतो.
हे छोटे काळे बियाणे पोषणमूल्यांनी भरलेले असतात आणि त्यामुळे ते हेल्दी डाएटमध्ये महत्त्वाचे मानले जातात. मात्र, चुकीच्या पद्धतीने त्यांचे सेवन केल्यास फायद्याऐवजी गंभीर त्रास उद्भवू शकतो.
जर चिया बियाणे भिजवल्याशिवाय थेट खाल्ले आणि त्यावर पाणी प्याले, तर त्या बियाण्यांमध्ये पाण्यामुळे झपाट्याने फुगून जेल तयार होते.
हा जेल अन्ननलिकेत अडकण्याचा धोका निर्माण करतो, विशेषतः अशा व्यक्तींमध्ये ज्यांना गिळण्यास अडचण असते किंवा जे आधीपासून पचनाशी संबंधित आजारांनी ग्रस्त आहेत.
काही वेळा अशी स्थिती गंभीर बनते आणि रुग्णाला Endoscopy करावी लागते. कारण, चिया बियाणे पाण्यात भिजल्यावर आपल्या मूळ वजनाच्या तब्बल २७ पट फुगतात, त्यामुळे अन्ननलिकेचा मार्ग अडवण्याचा धोका अधिक वाढतो.
चिया बियाण्यांचा सर्वात सुरक्षित आणि उपयुक्त मार्ग म्हणजे ते पाण्यात भिजवून खाणे. संपूर्ण रात्रभर पाण्यात भिजवले तर उत्तमच; पण वेळ कमी असल्यास, किमान ३० मिनिटे तरी भिजवणे आवश्यक आहे. भिजवल्यानंतर जेव्हा बियाण्यांचा पोत जेलसारखा होतो, तेव्हा ते पचायला सुलभ होतात आणि शरीरासाठी फायदेशीर ठरतात.
सुरुवातीला दररोज १ चमचा भिजवलेले चिया बियाणे घेऊन शरीराची सवय करून घ्या. नंतर हळूहळू प्रमाण वाढवले तरी चालते, पण नेहमीच भिजवूनच खाण्याची सवय अंगीकारा.
कोरडे चिया बियाणे खाल्ल्यास अन्ननलिकेत अडकू शकतात.
चुकून गिळल्यास घसा गुदमरू शकतो.
एंडोस्कोपीसारख्या वैद्यकीय हस्तक्षेपाची गरज भासू शकते.
चिया बियाणे नेहमी पाण्यात भिजवूनच खा.
आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या चिया बियाण्यांचा वापर योग्य प्रकारे करणे अत्यावश्यक आहे. चुकीची पद्धत जीवघेणी ठरू शकते, त्यामुळे खबरदारी हवीच!