Saisimran Ghashi
हिरोजी इंदलकर यांनी रायगडाची निर्मिती केली, पण त्यासाठी कोणतीही पदवी, सोनं-नाणं, देशमुखी किंवा इनाम मागितलं नाही. त्यांनी फक्त एक पायरी मागितली जिथून शिवराय जगदीश्वर मंदिरात जात असत, त्या पायरीवर चरणधूळ लागावी, हीच त्यांची इच्छा होती.
आजही रायगडावरील त्या पायरीवर “सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर” असे ठसठशीतपणे कोरलेले आहे. ही पायरी आजही "सेवेची पायरी" म्हणून ओळखली जाते.
हिरोजी इंदलकर हे केवळ रायगडाचे बांधकाम करणारे नव्हते, तर संपूर्ण स्वराज्याचे अत्यंत कर्तव्यदक्ष इंजिनीयर होते. स्वराज्याचे अनेक किल्ले त्यांच्या मार्गदर्शनाखाली मजबूत बांधले गेले.
हिरोजी यांच्या बरोबरच इंदुलकर घराण्यातील दत्ताजी इंदलकर हे पायदळ प्रमुख होते, रंगोजी इंदुलकर हे अजिंक्यतारा व तोरणा किल्ल्याचे सुभेदार होते. म्हणजेच इंदलकर परिवाराने अनेक पिढ्यांपर्यंत स्वराज्याची सेवा केली.
रायगडाच्या बांधकामासाठी पैशांची कमतरता आली तेव्हा हिरोजींनी आपला वाडा आणि जमिनीजुमला विकून काम पूर्ण केले. शिवराय तिथे नसतानाही त्यांनी निष्ठेने काम चालू ठेवले.
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी जेव्हा महाराजांनी विचारले, "काय हवं आहे?" तेव्हा हिरोजींनी पुन्हा एकदा कोणताही लाभ न घेता, "फक्त पायरी लावण्याची परवानगी द्या" असे उत्तर दिले.
इंदुलकर घराण्याचे हरजी इंदलकर, हंसाजी इंदुलकर यांनी छत्रपतींच्या तिसऱ्या पिढीपर्यंत निष्ठेने सेवा केली. ही परंपरा सेवेच्या मूळ तत्त्वावर आधारित होती.
इंदुलकर घराण्याचे वंशज समीर इंदलकर आहेत. या वंशजांकडे आजही काही ऐतिहासिक वस्तू जतन केलेल्या आहेत. तीन गावांमध्ये त्यांचा वतनावरचा मान आहे. साताऱ्यातील काळ भैरवनाथाच्या यात्रेत त्यांचा मान विशेष महत्त्वाचा आहे.
इंदलकरांचे वंशज अनिल इंदलकरांच्या मते, "शिवरायांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली," हीच त्यांची खरी संपत्ती आणि अभिमान आहे. ही सेवेची परंपरा आजही प्रेरणादायक आहे.