सकाळ डिजिटल टीम
जगात अनेक दुर्मीळ आणि ऐतिहासिक ग्रंथ आहेत, पण काही पुस्तके अशी आहेत जी सामान्य माणसासाठी केवळ माहितीपुरतीच मर्यादित राहतात. असेच एक अनोखे आणि रहस्यमय पुस्तक म्हणजे डेव्हिल्स बायबल, ज्याबद्दल अनेक आख्यायिका आणि कुतूहलजनक माहिती प्रसिद्ध आहे.
डेव्हिल्स बायबल किंवा Codex Gigas हे मध्ययुगीन काळातील एक विशाल हस्तलिखित पुस्तक आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे भव्य आकारमान, त्यातील सैतानाचे चित्र आणि त्यासंदर्भातील गूढ कथा. या पुस्तकात धार्मिक मजकूरासोबत इतर अनेक ऐतिहासिक माहिती नोंदवलेली आहे.
ऐकायला आश्चर्य वाटेल, पण असं मानलं जातं की हे पुस्तक एका रात्रीत लिहिलं गेलं आहे. या मागं एक भयानक आख्यायिका देखील आहे. लेखकानं आपला जीव वाचवण्यासाठी सैतानाशी करार (सौदा) केला आणि त्याच्या मदतीनं संपूर्ण पुस्तक एकाच रात्रीत लिहिलं, अशी लोककथा आहे.
या ग्रंथाच्या पानांवर सैतानाचे एक पूर्णपणे चित्र असलेले एक पान आहे, जे इतर सर्व पुस्तकांपेक्षा वेगळे आणि थरारक ठरते. तसेच, या पुस्तकाची पाने कागदावर नसून जनावरांच्या चामड्यावर लिहिलेली आहेत. यामुळेच त्याला 'डेव्हिल्स बायबल' किंवा 'सैतानिक बायबल' असंही म्हणतात.
सध्या हे पुस्तक स्वीडनच्या नॅशनल लायब्ररीमध्ये (National Library of Sweden) ठेवलं आहे. अत्यंत सुरक्षिततेत आणि विशिष्ट परवानगीनेच ते पाहता येते.
या पुस्तकाची किंमत कितीही मोठी असली तरी ते ना विक्रीसाठी आहे, ना कोणी खरेदी करू शकतो. हे ग्रंथालयीन संपत्ती म्हणून सुरक्षित ठेवण्यात आले आहे आणि ते केवळ अभ्यासक व शास्त्रज्ञांनाच अभ्यासासाठी उपलब्ध करून दिले जाते.
ही माहिती सर्वसामान्य स्रोतांवर आधारित असून यामधील कथानक, श्रद्धा आणि दावे वैयक्तिक विश्वास व ऐतिहासिक आख्यायिकांवर आधारित आहेत. eSakal या माहितीची पुष्टी करत नाही.