Pranali Kodre
मँचेस्टरला भारत आणि इंग्लंड संघात २३ ते २७ जुलैदरम्यान झालेला कसोटी सामना अनिर्णित राहिला.
इंग्लंडने ३११ धावांची आघाडी पहिल्या डावात घेतल्यानंतर पराभवाची टांगती तलवार डोक्यावर असताना शेवटच्या दोन दिवसात केएल राहुल, कर्णधार शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी दमदार फलंदाजी केली.
दुसऱ्या डावात केएल राहुल आणि शुभमन गिल यांच्यात १८८ धावांची भागीदारी तिसऱ्या विकेटसाठी झाली, तर पाचव्या विकेटसाठी रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी नाबाद २०३ धावांची नाबाद भागीदारी केली.
दुसऱ्या डावात भारताकडून केएल राहुलने ९० धावांची खेळी केली, तर शुभमन गिलने १०३ धावा, रवींद्र जडेजाने नाबाद १०७ धावा आणि वॉशिंग्टन सुंदरने नाबाद १०१ धावांची शतकी खेळी केली.
त्यामुळे भारताच्या कसोटी क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळालं की कसोटीमध्ये दुसऱ्या डावात भारताच्या तीन खेळाडूंनी शतके केली आहेत.
यापूर्वी कधीही कसोटी सामन्यात भारताकडून दुसऱ्या डावात तीन खेळाडूंनी शतके केली नव्हती. दुसऱ्या डावात दोन शतके यापूर्वी झाली आहेत, पण तीन शतके पहिल्यांदाच झाली.
मँचेस्टर कसोटीत भारताने पहिल्या डावात ३५८ धावा केल्या, इंग्लंडने पहिल्या डावात ६६९ धावा करत ३११ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताने सामना संपेपर्यंत ४ बाद ४२५ धावा केल्या होत्या.