Pranali Kodre
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.
या स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना २३ फेब्रुवारी रोजी दुबईत होणार आहे.
या सामन्याबाबत स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलाताना माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने प्रतिक्रिया दिली आहे.
रैना म्हणाला, मला वाटतं दोन्ही संघांना ५०-५० टक्के संधी आहे. पण विराट कोहली पुन्हा एकदा भारताला विजय मिळवून देईल, त्याची कामगिरी अनन्यसाधारण असेल.
मात्र, मला वाटतं की पाकिस्तानकडे चांगली गोलंदाजी फळी आहे. आपल्याकडे दोन डावखुरे वेगवान गोलंदाज आहेत, पण त्यांचेही गोलंदाज जिद्दी आहेत आणि ते दुबईत खेळणार आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी जमेची बाजू असेल, असंही रैना म्हणाला.
रैना पुढे म्हणाला, पाकिस्तानने दुबईमध्ये मोठ्याप्रमाणात क्रिकेट खेळले आहे आणि इथेच त्यांच्याविरुद्ध टी२० वर्ल्ड कप सामना हरला होता. पण यावेळी परिस्थिती वेगळी असेल. रोहित शर्माला माहित आहे की पाकिस्तान, बांग्लादेश आणि न्यूझीलंडविरुद्धचे सामने महत्त्वाचे आहेत.
याशिवाय रैना म्हणाला की पहिल्या तीन फलंदाजांपैकी किमान एकाने ३५ व्या षटकापर्यंत फलंदाजी करायला हवी. त्यानंतर भारताकडून आक्रमक खेळणारे फलंदाज आहेत.
भारत आणि पाकिस्तान सामन्यावेळी वेगळे वातावरण असते, अनेक लोक या सामन्यासाठी दुबईला जातील, असंही रैना म्हणाला.