kimaya narayan
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि महाराष्ट्रावरील अन्याय दूर केला. पण या लढाईत महाराज एकटे नव्हते. त्यांच्या लाडक्या मावळ्यांबरोबरच त्यांना साथ होती शूर स्त्रियांची. जाणून घेऊया स्वराज्याच्या इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या स्त्रियांविषयी.
स्वराज्याची प्रेरणा आणि त्याचं बीज छत्रपती शिवरायांच्या मनात रुजवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचं कार्य अतुलनीय आहे. महाराज मोहिमेवर असताना राज्यकारभार जिजाऊ पाहायच्या. इतकंच नाही वेळप्रसंगी हातात तलवार घेऊन मैदानातही उतरल्याचा उल्लेख इतिहासात आहे.
छत्रपती शिवरायांच्या लाडक्या पट्टराणी महाराणी सईबाई राणीसाहेब यांचं योगदान अल्पायुष्यामुळे कमी असलं तरीही अतुलनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वाच्या सल्लागारांपैकी त्या एक होत्या. इतकंच नाही तर महाराजांच्या अनुपस्थितीत जिजाऊंना राज्यकारभारात त्या मदत करायच्या.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या सुनबाई आणि छत्रपती संभाजी महाराजांची कर्तृत्ववान पत्नी म्हणजे महाराणी येसूबाई. स्वराज्याचं कुलमुखत्यार पद छत्रपती शंभूराजांनी येसूबाईंना दिलं होतं. छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्यावर युवराज राजारामांना स्वराज्याच्या गादीवर बसवून स्वतः औरंगजेबाकडे कैद होणाऱ्या या महाराणीचं योगदान अतुलनीय.
छत्रपती राजारामांच्या अकाली निधनानंतर स्वराज्याची ज्योत ज्यांनी तेवत ठेवली आणि औरंगजेबाशी ज्यांनी निकराने लढा दिला त्या म्हणजे महाराणी ताराराणी. मोगलमर्दिनी म्हणून त्यांची इतिहासात ओळख आहे. त्यांच्या झुंजार व्यक्तिमत्त्वाचा वचक औरंगजेबालाही बसला होता.
स्वराज्याच्या महत्कार्यात ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं त्या म्हणजे बांदल घराण्याच्या दीपाबाई बांदल. महाराणी सईबाई राणीसाहेबांच्या नात्याने आत्या पण स्वराज्यातील त्यांचं योगदान मोठं. स्वराज्यातील न्यायदानाचं काम त्या पाहायच्या आणि पावनखिंडीच्या लढाईत त्यांनी त्यांचा मुलगा बाजी आणि बांदल सैन्य गमावलं.
भद्रकाली या नावाने इतिहासात ज्यांचा उल्लेख आहे त्या म्हणजे सरसेनापती उमाबाई दाभाडे. पतीच्या निधनानंतर उमाबाई यांनी स्वतः हातात तलवार घेत स्वराज्याच शत्रूपासून रक्षण केलं.