Mansi Khambe
पावसाळ्यात केस गळणे ही एक मोठी समस्या बनते. पावसाळ्यातील जास्त आर्द्रता केसांमधील नैसर्गिक तेल काढून टाकते, ज्यामुळे केस कोरडे आणि कमकुवत होतात, परिणामी केसगळती वाढते.
तसेच पावसाचे पाणी केसांवर पडल्याने केसात कोंडा होण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी केसांची योग्य निगा न राखल्यास केसगळती वाढू शकते.
जास्त गरम पाण्याने केस धुतल्यास केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात. त्याचबरोबर तणाव केस न धुणे किंवा योग्य काळजी न घेतल्यामुळेही केसगळती होते.
दरम्यान पावसाळ्यातच नव्हे तर केस गळतीच्या समस्येपासून कायमची मुक्तता मिळवण्यासाठी जास्वंदाचे फुल चांगलेच फायद्याचे ठरू शकते.
केस गळतीच्या समस्यांपासून अनेकजण हैराण होतात. यावर उपाय म्हणून तुम्ही हिबिस्कस म्हणजेच जास्वंदाच्या फुलांपासून बनवलेले तेल देखील वापरू शकता.
सर्वात आधी, १०-१२ हिबिस्कस फुलांच्या पाकळ्या धुवून घ्या. त्यानंतर त्या चांगल्या प्रकारे वाळवा.
आता एका पॅनमध्ये अर्धा कप खोबरेल तेल गरम करून त्यात वाळलेल्या जास्वंदाच्या पाकळ्या घाला. हे मिश्रण मंद आचेवर सुमारे ५ मिनिटे शिजवा आणि नंतर थंड होऊ द्या.
केस धुण्यापूर्वी आठवड्यातून दोन वेळा या तेलाने केसांना चांगली मालिश करा. दरम्यान तासाभरानंतर केस धुवून घ्या. तसेच केस धुतल्यानंतर ते पूर्णपणे कोरडे होऊ द्या.
या केसांच्या तेलाच्या मदतीने केस गळतीची समस्या काही आठवड्यांतच कमी होण्यास सुरुवात होईल.