Mansi Khambe
हिंदू धर्मात भगवान शिव सर्वात शक्तिशाली देवांपैकी एक आहे. भगवान शिव या देवतेला शंकर, महादेव, नटराज, रुद्र अशा अनेक नावांनी ओळखले जाते. राज्यभरात भगवान शंकराची विविध रूपांत पूजा केली जाते.
भारतात शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग स्वरूपातील पूजेला विशेष महत्त्व आहे. शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग हे एकच असल्याचे अनेकांना वाटते. मात्र यामध्ये फरक आहे. तो फरक काय? याबाबत जाणून घ्या.
‘शिवलिंग’ हे भगवान शिवाचे एक रूप आहे. याची पूजा सर्वात व्यापक आणि सामान्यपणे केली जाते.
शिवलिंग आकाराने दंडगोलाकार आणि त्याभोवती शाळुंका असा शिवलिंगाचा आकार असतो. शाळुंका हे स्त्रीच्या योनीचे प्रतिक असते अशी धारणा आहे.
शिवलिंग हे मानवाने तयार केले आहे. ज्यामध्ये ते विविध साहित्याने तयार केले जाते. पारंपरिकपणे ते संगमरवरी किंवा दगडाने तयार केले जाते. परंतु आज लोक ते धातू, लाकूड किंवा अगदी मातीपासून तयार करू लागले आहेत.
ज्योतिर्लिंग हे भगवान शंकराचे रूप आहे आणि ते माणसाने निर्माण केलेले नाही. त्यामुळे ज्योतिर्लिंग हे ‘स्वयंभू’ असल्याचे म्हटले जाते, म्हणजेच ते स्वतः प्रकट झालेले आहे.
ज्योतिर्लिंग सोन्याने, दगडाने किंवा तांब्याने तयार करण्याऐवजी स्वतः देवाची ऊर्जा आणि मातीने तयार गेले असे म्हणतात.
शिवपुराणानुसार, जिथे भगवान शंभर ज्योतीच्या म्हणजेच प्रकाशाच्या रूपात प्रकट झाले, त्यांना ज्योतिर्लिंग म्हणतात. देशात एकूण १२ ज्योतिर्लिंगे आहेत, या ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्याने भगवान शंकराचे विशेष आशीर्वाद मिळतात.
१२ ज्योतिर्लिंगे भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्थित आहेत, जसे की सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, वैद्यनाथ, भीमाशंकर, रामेश्वरम, नागेश्वर, विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ आणि घृष्णेश्वर.