Monika Shinde
रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या अतूट नात्याचं प्रतीक. या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या रक्षणासाठी मनापासून प्रार्थना करते. पण हा धागा किती दिवस हातात ठेवावा, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.
हिंदू धर्मात राखी श्रावण पौर्णिमेला बांधली जाते. शास्त्रानुसार, ही राखी किमान एक आठवडा तरी हातात ठेवावी, असं मानलं जातं. यामागे श्रद्धा आणि परंपरेचा आधार आहे.
राखी हा केवळ एक धागा नाही, तर तो एक रक्षणसूत्र असतो. बहिणीच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने भारलेली राखी काही दिवस हातात राहणं शुभ मानलं जातं. ती नकारात्मक शक्तींपासून रक्षण करत असल्याचंही मानलं जातं.
काही भागांमध्ये राखी श्रावण महिना संपेपर्यंत, म्हणजेच १५-२० दिवस घातली जाते. तर काही जण ती कृष्ण जन्माष्टमी येईपर्यंत ठेवतात. दोन्ही पद्धती योग्यच मानल्या जातात. तुमच्या कुटुंबातील परंपरेनुसार ती ठरते.
राखी प्रामुख्याने कापूस, रेशीम किंवा सुताच्या धाग्याने बनवलेली असते. ती खूप दिवस घातल्यास त्वचेला खाज, लालसरपणा किंवा अॅलर्जी होण्याची शक्यता असते. म्हणून ७-१० दिवसांत ती काढणे अधिक आरोग्यदायी ठरते.
काहीजण राखी वर्षभर हातात ठेवतात. आठवणी म्हणून. पण शास्त्रानुसार जुनी राखी अशुद्ध होऊ शकते. जुना धागा नकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवतो, असंही मानलं जातं. त्यामुळे भावना राखत, योग्य वेळी राखी विसर्जित करणं योग्य ठरतं.
राखी काढल्यानंतर ती सरळ कचऱ्यात टाकू नये. ती झाडाला बांधणं, वाहत्या पाण्यात विसर्जन करणं किंवा पवित्र जागी ठेवणं हा अधिक सन्मानाचा मार्ग आहे.
कोणी राखी तीन दिवस ठेवतो, तर कोणी ती महिनाभर हातात बांधतो. पण महत्त्व राखीच्या दिवसांचं नाही, तर भावनेचं आहे. राखी किती दिवस ठेवावी, हा प्रश्न नसून ती किती प्रेमाने आणि श्रद्धेने बांधली, यालाच खरं महत्त्व आहे.