सकाळ डिजिटल टीम
केशर हा जगातील सर्वात महागडा आणि मौल्यवान मसाला मानला जातो. बाजारात उपलब्ध असलेल्या केशराची किंमत खूपच जास्त असते, त्यामुळे घरी केशर वाढवणे ही एक फायदेशीर कल्पना ठरू शकते.
योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास, आपण आपल्या बागेत किंवा गच्चीवर केशराची यशस्वी लागवड करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया, घरी केशर कसे वाढवावे?
केशराची लागवड कंदांद्वारे (Bulbs/Corms) केली जाते. त्यामुळे सुरुवातीला उच्च प्रतीचे व रोगमुक्त कंद बाजारातून किंवा विश्वसनीय स्रोतातून खरेदी करा.
प्रत्येक केशर कंद ८ ते १३ सेंटीमीटर खोल मातीच्या खड्ड्यात लावा. प्रत्येक कंदामध्ये सुमारे १० सेंटीमीटरचे अंतर ठेवा, जेणेकरून झाडांना मोकळीक मिळेल आणि ते नीट वाढतील.
केशराच्या चांगल्या वाढीसाठी दररोज ५ ते ६ तास नैसर्गिक सूर्यप्रकाश आवश्यक असतो. त्यामुळे लागवडीसाठी बाग, गच्ची किंवा बाल्कनीतील उजेडीत जागा निवडा.
केशर झाडांना फारसे पाणी लागणार नाही. मातीमध्ये फक्त ओलावा राहील इतपतच पाणी द्या. जास्त पाणी दिल्यास कंद कुजण्याची शक्यता असते.
केशराची नाजूक आणि सुंदर फुले ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान उमलतात. फुलांची कापणी सकाळच्या वेळेत करावी, कारण त्यावेळी त्यात सुगंध आणि गुणधर्म टिकून असतात.
फुलं तोडल्यानंतर, ती सावलीत किंवा सौम्य उन्हात वाळवावीत. त्यानंतर वाळलेले केशर हवाबंद डब्यात, थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवा. अशा पद्धतीने केशर दीर्घकाळ टिकवून ठेवता येते.