Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव उच्चारताच त्यांच्या पराक्रमी जीवनाविषयी, कार्याविषयी आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात अनेक थरारक आणि प्रेरणादायी घटना आहेत. त्यापैकी एक रोचक प्रसंग असा सांगितला जातो की, तामिळनाडूच्या जंगलात महाराजांचे तब्बल ४०० घोडे चोरीला गेले होते.
हा प्रकार तामिळनाडूच्या घनदाट जंगलात घडला होता आणि त्याची नोंदही करण्यात आली होती.
महाराष्ट्रापासून १२०० कि.मी. दूरच्या अनोळखी प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांची मोहीम होती
छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिण भारत मोहीम डिसेंबर १६७६ ते एप्रिल मे १६७८ तब्बल दिड वर्ष सुरु होती.
सभासद बखर आणि इंग्रजी नोंदींनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांनी या मोहिमेसाठी सुमारे २० हजार घोडदळ आणि ३० हजार पायदळ सैनिकांसह प्रस्थान केले होते.
या मोहिमेदरम्यान स्वत: छत्रपती शिवाजी महाराज छावणीत असताना ४०० घोडे चोरीला गेल्याची घटना घडली.
हा प्रकार प्रत्यक्ष पाहणारे जर्मेन आणि कॅटेलने यांनी घोड्यांची चोरी नेमकी कशी झाली, याचे सविस्तर वर्णन केले आहे. याचा उल्लेख मार्टिनच्या डायरीत आढळतो.
शिवराय आपल्या सैन्यासह तामिळनाडूमध्ये दाखल झाले. तेव्हा दक्षिण भारतातून आदिलशाही सत्तेचे उच्चाटन सुरु झाले.
बंगळुरु, जिंजी, वेल्लोर, सालेम, पाँडीचेरी, अरेलूर आणि तंजावर या प्रदेशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी यशस्वी लष्करी मोहिमा राबवल्या.
कोल्लीडम परिसराचा मुख्य सुभेदार शेरखान लोधी होता. त्यानंतर २० मे १६७७ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजीचा अभेद्य किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला.
महाराजांचा उद्देश शेरखानाचा कायमचा बंदोबस्त करण्याचा होता. मात्र तिरुवाडीच्या लढाईत पराभव पत्करल्यानंतर शेरखान रणांगणातून पळ काढण्यात यशस्वी झाला.
मराठ्यांच्या तुकडीने त्याचा पाठलाग करून २७० घोडे, २० उंट, अनेक बैल तसेच तंबू, नगारे आणि इतर साहित्य जप्त केले.
२७ जून १६७७ रोजी मराठा सैन्याच्या तुकडीने शेरखानावर पुन्हा जोरदार आक्रमण केले. या कारवाईत त्याचे ३०० घोडे आणि ४ हत्ती मराठ्यांनी जप्त केले.
पराभवानंतर पळ काढलेल्या शेरखानने भुवनगिरी किल्ल्यात आश्रय घेतला. त्यानंतर महाराजांनी किल्ल्यावर चढाई करत त्याला चारही बाजूंनी घेरले. अखेर शेरखानने शरणागती पत्करली.
शरेखानने तह करत स्वत:चा मुलगा महाराजांकडे ओलीस ठेवला अन् तो अरेलुच्या जंगलात निघून गेला.
त्यानंतर शिवाजी महाराज पुढील मोहीमेवर निघाले. दक्षिण दिशेला तंजावरकडे निघाले. कोल्लीडम नदीच्या काठावर तिरुमझपाडी या गावात महाराजांची छावणी होती.
पाँडिचेरीचे तत्कालीन प्रमुख अधिकारी फ्राँस्वा (फ्रान्सिस) मार्टिन यांनी सर्व घडामोडींची नोंद केली. त्यांच्या या नोंदी Memoirs of François Martin या पुस्तकात प्रकाशित आहेत.
या पुस्तकानुसार, चोरीची घटना अलेरुच्या जंगलात घडल्याचा उल्लेख आहे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची छावणी या जंगलापासून अवघ्या ५०० ते ६०० पावलांच्या अंतरावर होती.
दररोज रात्री घोडे रहस्यमयरीत्या चोरीला जात होते. याबाबत शिवरायांनी चोरांच्या नायकाकडे तक्रार केली, मात्र त्याने चोरीत आपला कोणताही सहभाग नसल्याचा दावा केला.
जर्मेन कार्टेल आणि कॅटल यांनी चोरांना पाहिले होते. एक व्यक्ती हत्यारासह छावणीत शिरला आणि चोरी करून जंगलात पसार झाला.
जहे चोर अरेलुच्या जंगलात राहणाऱ्या कल्लार जमातीतील होते. गुरे-ढोरे चोरी करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. इतकेच नव्हे, तर मोठी रक्कम मिळाल्यास ते लष्करी छावणीच्या मध्यभागातूनही घोडे चोरून नेत असत.
शिवाजी महाराजांना या कटामागे शेरखान असल्याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पावले उचलली. अरेलुच्या नायकाने शेरखानला आश्रय दिल्याचे समोर आल्यानंतर महाराजांनी त्याच्यावर कारवाई करत त्याला चांगलीच अद्दल घडवली.