Pranali Kodre
ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर कसोटी मालिकेतील चौथा सामना २६ डिसेंबर 2024 सुरू झाला.
बॉक्सिंग डे कसोटी असलेल्या या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने ८२ धावांची खेळी केली.
त्यामुळे त्याने भारतासाठी एका वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकरच्या २००२ मध्ये केलेल्या १३९२ धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
जैस्वाल आता भारतासाठी एका वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिनला मागे टाकत पाचव्या क्रमांकावर आला आहे. त्याने २०२४ वर्षात २८ डावात १३९४ कसोटी धावा केल्या आहेत.
या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावरही सचिन तेंडुलकर आहे. त्याने २०१० मध्ये कसोटीत २३ डावात १५६२ धावा केल्या होत्या.
दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर विरेंद्र सेहवाग असून त्याने २००८ मध्ये १४६२ धावा केल्या होत्या, तर २०१० मध्ये १४२२ धावा केल्या होत्या.
चौथ्या क्रमांकावर सुनील गावसकर आहेत. त्यांनी १९७९ साली कसोटीत १४०७ धावा केल्या होत्या.
आता जैस्वालला बॉक्सिंग डे कसोटीत जर दुसर्या डावातही खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने मोठी खेळी केली, तर तो गावसकर आणि सेहवाग यांनाही मागे टाकण्याची त्याला संधी आहे.