Pranali Kodre
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ऍडलेड ओव्हल स्टेडियमवर ६ डिसेंबरपासून सुरू झाला.
हा दिवस-रात्र कसोटी सामना असल्याने गुलाबी चेंडूने खेळला जात आहे.
या सामन्यातून भारताचा कर्णधार रोहित शर्माने पालकत्व रजेनंतर पुनरागमन केले आहे.
पण या सामन्यात रोहित शर्माने सलामीला न खेळता मधल्या फळीत खेळण्याचा निर्णय घेतला. त्याने स्वतःच्या क्रमांकापेक्षा संघहित आपल्यासाठी प्राधान्याचे असल्याचे सांगत हा निर्णय घेतला.
त्यामुळे केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल सलामीला फलंदाजीला उतरले, तर रोहित ६ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला.
दरम्यान, रोहितने कसोटीमध्ये तब्बल २१७२ दिवसांनी मधल्या फळीत फलंदाजी केली. मात्र त्याला अवघ्या ३ धावांवरच स्कॉट बोलंडने पायचीत केले. रोहितने २३ चेंडू खेळले होते.
रोहितने या सामन्यापूर्वी अखेरच्यावेळी कसोटीत मधल्या फळीत २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच मेलबर्नला बॉक्सिंग डे (२६ डिसेंबर) कसोटीत फलंदाजी केली होती.
रोहितने कसोटीमध्ये ऍडलेडमधील कसोटीपूर्वी ५ व्या क्रमांकावर १६ डावात ३ अर्धशतकांसह ४३७ धावा केल्या आहेत, तर सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना २५ डावात ३ शतके आणि ६ अर्धशतकांसह १०३७ धावा केल्या आहेत.