Pranali Kodre
सुनील गावसकर यांचा जन्म १० जुलै १९४९ साली मुंबईत झाला. त्यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने त्याच्याबद्दल १० खास गोष्टी जाणून घ्या
गावसकरांचा जन्म झाल्यानंतर नर्सने त्यांना चुकून मासेमारी करणाऱ्या कुटुंबातील महिलेच्या शेजारी ठेवले होते. पण गावसकरांच्या एका नातेवाईकाने त्यांच्या कानाजवळील खूण पाहिली असल्याने लगेचच त्याबद्दल दवाखाण्यात विचारणा करण्यात आली आणि गावसकर सापडले. जर तसं झालं नसतं, तर गावसकर मासेमारी करणाऱ्या कुटुंबात मोठे झाले असते.
सुनील गावसकरांच्या कुटुंबातही क्रिकेटचा वारसा आहे. त्यांचे मामा माधव मंत्री भारतासाठी ४ कसोटी सामने खेळले. तसेच भारताचे माजी क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ त्यांचे मेव्हणे होते. गावसकरांची बहीण कविता यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते.
गावसकर रणजी पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद झाले होते.
इंग्लंडविरुद्ध एकदा ओल्ड ट्रॅफर्डवर खेळताना डोळ्यांवर सातत्याने केस येण्याचा त्रास होत असल्याने गावसकरांनी मैदानातच अंपायर डिकी बर्ड यांना केस कापायला सांगितले होते.
त्यांच्या आत्मचरित्रात 'Sunny Days' मध्ये ते लिहितात की, त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्या दोन धावा अंपायरच्या चुकीमुळे मिळाल्या. त्यावेळी त्यांच्या पॅडला लागून बॉल फाईन लेगला गेलेला पण अंपायला वाटले त्यांनी शॉट खेळला.
सुनील गावसकर यांनी १९७१ साली वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेनमध्ये मार्चमध्ये कसोटीत पदार्पण केले होते. त्यानंतर १९७४ साली त्यांनी लीड्समध्ये इंग्लंडविरुद्ध वनडे पदार्पण केले
सुनील गावसकर कसोटीत १० हजार धावा करणारे जगातील पहिले क्रिकेटपटू आहेत. त्यांनी पाकिस्तानविरुद्ध खेळताना त्यांच्या १२४ व्या सामन्यात हा कारनामा केला होता.
गावसकरांनी त्यांच्या मुलाचे नाव त्यांचे आवडते तीन क्रिकेटपटू रोहन कन्हाई, एमएल जयसिंह आणि गुंडप्पा विश्वनाथ यांच्यावरून 'रोहन जयविश्वा' असं ठेवलं होतं. परंतु, नंतर अधिकृतरित्या त्याचं नाव रोहन सुनील गावसकर असं नोंदवण्यात आलं.
सुनील गावसकरांनी चार पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी 'सनी डेज' हे आत्मचरित्र लिहिले, तर आयडॉल्स, रन अँड रुईन्स, वन डे वंडर्स ही पुस्तकही लिहिवी आहेत.
गावसकर यांनी 'सावली प्रेमाची' या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती, तसेच मालामाल या हिंदी चित्रपटात ते पाहुणे कलाकार होते. त्यांनी 'या दुनिये मध्ये थांबायला वेळ कोणाला' हे मराठी गाणंही गायलं आहे.
सुनील गावसकर यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १२५ कसोटी सामने खेळले असून १०१२२ धावा केल्या. यामध्ये ३४ शतकांचा समावेश आहे. तसेच त्यांनी १०८ वनडे सामन्यांत १ शतकासह ३०९२ धावा केल्या.