सकाळ डिजिटल टीम
भारतातील लेण्या म्हणजे केवळ दगडांत कोरलेली शिल्पं नाहीत, तर त्या आपल्या इतिहासाचा अनमोल ठेवा आहेत. प्रत्येक लेणी शतकानुशतकांपूर्वीच्या कथा, श्रद्धा आणि कलात्मकतेची साक्ष देतात.
आंध्र प्रदेशातील उंडावल्ली लेण्या शांत आणि रमणीय वातावरणासह वास्तुशिल्पासाठी प्रसिद्ध आहेत. या लेण्या बौद्ध आणि हिंदू परंपरेचे दर्शन घडवतात.
महाराष्ट्रातील अजंठा आणि वेरूळ (एलोरा) लेण्या या यूनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये मोडतात. येथील भित्तीचित्रे आणि शिल्पकला भारताच्या प्राचीन बौद्ध, हिंदू आणि जैन परंपरांचे दर्शन घडवतात.
कर्नाटकमधील बदामी लेण्या सहाव्या आणि सातव्या शतकात कोरलेल्या असून, त्यातील भिंतींवरचे नक्षीकाम चालुक्यकालीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
मुंबईजवळील एलिफंटा लेण्या भगवान शिवाला अर्पण करण्यात आलेल्या आहेत. येथे कोरलेली त्रिमूर्ती शिल्प हे शिवाच्या तीन रूपांचे भव्य चित्रण करते.
ओडिशामधील उदयगिरी आणि खंडगिरी लेण्या या एकत्रितपणे सुमारे ३३ लेण्यांचा समूह असून, त्यात जैन धर्माचे अनेक शिल्पसंग्रह पाहायला मिळतात.
मध्य प्रदेशातील बाघ लेणी बौद्ध धर्माशी संबंधित असून, त्यातील भित्तीचित्रे अतिशय आकर्षक आणि प्रभावी आहेत. या लेण्या थेट खडकात कोरून तयार करण्यात आल्या आहेत, जे प्राचीन भारताच्या स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना आहे.