सकाळ डिजिटल टीम
भारताचा राष्ट्रध्वज, म्हणजेच तिरंगा हा कसा तयार झाला आणि या मागचा इतिहास काय आहे. या बद्दल जाणून घ्या.
भारताचा पहिला राष्ट्रध्वज ७ ऑगस्ट १९०६ रोजी कलकत्ता (आताचे कोलकाता) येथील पारसी बागान चौकात फडकवण्यात आला. त्यात हिरवा, पिवळा आणि लाल असे तीन पट्टे होते. हिरव्या पट्ट्यावर आठ कमळाची फुले होती, तर लाल पट्ट्यावर चंद्र आणि सूर्य यांची चिन्हे होती.
१९०७ मध्ये मॅडम भिकाजी कामा यांनी पॅरिसमध्ये दुसरा ध्वज फडकवला. यामध्ये देखील तीन रंग होते, मात्र तो काहीसा वेगळा होता. यात हिरवा, केशरी आणि लाल पट्टे होते.
डॉ. ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी १९१७ मध्ये 'होमरूल लीग'साठी एक नवीन ध्वज तयार केला. या ध्वजात पाच लाल आणि चार हिरवे पट्टे होते, तसेच सप्तर्षी तारकांचे चिन्ह होते.
१९२१ मध्ये महात्मा गांधींनी लाल, हिरवा आणि पांढरा पट्टा असलेला तसेच मध्यभागी चरख्याचे चिन्ह असलेला ध्वज सुचवला. यातील प्रत्येक रंगाचा आणि चिन्हाचा विशिष्ट अर्थ होता.
स्वातंत्र्यानंतर, राष्ट्रध्वजाला अंतिम स्वरूप देण्यासाठी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीने राष्ट्रध्वजामधील चरख्याऐवजी सारनाथ येथील अशोक स्तंभावर असलेले अशोक चक्र वापरण्याचा निर्णय घेतला.
अशोक चक्रात २४ आरे आहेत, जे २४ तास आणि जीवनातील २४ सद्गुणांचे प्रतीक आहेत. हे चक्र न्याय, प्रगती आणि धर्माचे प्रतीक आहे.
२२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने या ध्वजाला स्वतंत्र भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून अधिकृतपणे स्वीकारले.
ध्वजातील केशरी रंग शौर्य आणि त्यागाचे प्रतीक आहे, पांढरा रंग सत्य आणि शांततेचे प्रतीक आहे, तर हिरवा रंग समृद्धी आणि विश्वासाचे प्रतीक आहे.