Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ३१ मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने पहिल्या विजयाची नोंद केली. मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सला ८ विकेट्सने पराभूत केले.
मुंबईच्या विजयात २३ वर्षीय वेगवान गोलंदाज अश्वनी कुमार यांनी मोलाचा वाटा उचलला. त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला.
अश्वनी कुमारने या सामन्यातून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले. त्याने ३ षटके गोलंदाजी करताना २४ धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या.
अश्वनी कुमारकडे डावाच्या चौथ्या षटकात हार्दिक पांड्याने गोलंदाजीसाठी चेंडू सोपवला होता. यावेळी त्याने पहिल्याच चेंडूवर अजिंक्य रहाणेला ११ धावांवर बाद केले.
त्यामुळे आयपीएलच्या पदार्पणात मुंबई इंडियन्ससाठी पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा तो चौथा गोलंदाज आहे.
आयपीएलच्या पदार्पणात मुंबई इंडियन्ससाठी पहिल्याच चेंडूवर सर्वात आधी विकेट घेण्याचा कारनामा अली मुर्तझाने २०१० साली राजस्थान रॉयल्सविरुद्ध केला होता. त्याने नमन ओझाला बाद केले होते.
अल्झीरी जोसेफनेही आयपीएलच्या पदार्पणात मुंबई इंडियन्ससाठी पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याचा कारनामा केलाय. त्याने २०१९ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पहिल्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरला बाद केले होते.
डेवाल्ड ब्रेविसनेही आयपीएलच्या पदार्पणात मुंबई इंडियन्ससाठी पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. त्याने २०२२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीला बाद केले होते.