सकाळ डिजिटल टीम
बिहारचे लोकप्रिय आणि दबंग पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी शिवदीप वामनराव लांडे यांनी गुरुवारी (१९ सप्टेंबर) अचानक राजीनामा दिल्याची घोषणा केली.
“मी बिहारमध्ये १८ वर्ष काम करून सेवा दिली. बिहार माझे कुटुंब आहे. बिहारसाठी यापुढेही काम करत राहिल”, अशी पोस्ट शिवदीप लांडे यांनी लिहिली.
शिवदीप लांडे यांचा जन्म २९ ऑगस्ट १९७६ रोजी झाला. शेतकरी कुटुंबातून आलेल्या शिवदीप लांडे यांचे शिक्षण अकोला जिल्ह्यात झाले.
शिवदीप लांडे आपल्या यशाचे श्रेय आईला देतात. “वुमन बिहाईंड दी लायन”,असे पुस्तक त्यांनी लिहिले असून यामध्ये लहानपणीच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला आहे.
२०१४ साली त्यांनी शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांची कन्या डॉ. ममता शिवतारे यांच्याशी विवाह केला.
आपल्या लग्नाबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, माजी राज्यपाल डीवाय पाटील यांच्यामुळे माझे लग्न ठरले. त्यांनी मुलगी बघायला येण्यासाठी आग्रह केला होता, त्यानंतर माझे लग्न झाले.
शिवदीप लांडे यांच्या लग्नाला आता १० वर्ष झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवसाला ते पत्नीसाठी पोस्ट लिहित त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. तर त्यांनी आपल्या अनेक पोस्टमध्ये पत्नीचा उल्लेख गौरी या नावाने केला आहे
पोलिस सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेणारे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे आता राजकारणात उतरले असून त्यांनी बिहारमध्ये हिंद सेना नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे.