संतोष कानडे
दिल्लीतल्या जंतरमंतर मैदानावर आता आंदोलन करता येणार नाही, कारण सरकारने अशा परवानग्या देण्यास रोख लावली आहे.
जयपूरचे महाराजा सवाई जयसिंह (दुसरे) यांनी १७२४ मध्ये खगोलीय गणना आणि ग्रहांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी जंतर-मंतरची निर्मिती केली होती.
१९९० च्या दशकाच्या सुरुवातीपूर्वी दिल्लीत मोठ्या आंदोलनांचे प्रमुख ठिकाण 'बोट क्लब' असायचे.
हा परिसर इंडिया गेट आणि सध्याच्या कर्तव्य पथाजवळ आहे.
१९८८ मध्ये शेतकरी नेते महेंद्रसिंह टिकैत यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाच लाख शेतकऱ्यांनी येथे प्रचंड आंदोलन केले होते, ज्यामुळे संपूर्ण मध्य दिल्ली ठप्प झाली होती.
यानंतर मोठ्या गर्दीमुळे निर्माण होणाऱ्या सुरक्षाविषयक कारणांमुळे बोट क्लबवरील आंदोलनांवर मर्यादा आणण्यात आल्या.
त्यानंतर १९९३ च्या सुमारास जंतर-मंतर हे आंदोलनांचे प्रमुख केंद्र म्हणून पुढे आले.
ही बाब कोणत्याही एका औपचारिक घोषणेद्वारे नव्हे, तर सातत्याने होणाऱ्या आंदोलनांमुळे हळूहळू या जागेला ही नवी ओळख मिळाली.
कालांतराने हे ठिकाण राजकीय आणि सामाजिक चळवळींचे मुख्य केंद्र बनले.
२०११ मधील अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन आणि २०२३ मधील कुस्तीपटूंचे आंदोलन ही याची प्रमुख उदाहरणे आहेत.