Pranali Kodre
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघात १० फेब्रुवारी रोजी तिरंगी मालिकेतील वनडे सामना लाहोरला पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने ६ विकेट्सने विजय मिळवला होता.
न्यूझीलंडच्या या विजयात केन विलियम्सनने शतक ठोकत मोलाचा वाटा उचलला. त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
केन विलियम्सनने ११३ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह १३३ धावांची नाबाद खेळी केली. यासह त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
केन विलियम्सनने या शतकी खेळीसह वनडेत ७००० धावांचा टप्पा पार केला आहे. त्याने १५९ डावात ७००० वनडे धावा केल्या आहेत.
यामुळे आता सर्वात कमी डावात ७००० वनडे धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विलियम्सन विराट कोहलीला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
विराट या विक्रमाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर घसरला असून त्याने १६१ डावात ७००० वनडे धावा केल्या आहेत.
या यादीत अव्वल क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला असून त्याने १५० डावात ७००० धावा केल्या होत्या.
या यादीत चौथ्या क्रमांकावर एबी डिविलियर्स असून त्याने १६६ डावात ७००० वनडे धावा केल्या होत्या.
पाचव्या क्रमांकावर असलेल्या सौरव गांगुलीने १७४ डावात ७००० वनडे धावा केल्या होत्या.