Mansi Khambe
दात हे आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहेत, यामुळे आपण अन्न चावतो आणि स्पष्टपणे बोलतो. पण सध्या बदलती जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि निष्काळजीपणामुळे सर्व वयोगटातील लोकांना दातांच्या समस्या होत आहेत.
अनेकजण दाताच्या समस्या किरकोळ समजून याकडे दुर्लक्ष करतात. किंवा दातदुखीवर एखादं औषध घेऊन तात्पुरतं बरं करतात. मात्र हे काही काळानंतर चांगलंच महागात पडू शकतं.
अशावेळी दात कमकुवत का होतात? त्यांची काळजी कशी घ्यावी? असे प्रश्न पडतात. यावर डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मजबूत दातांसाठी शरीरात कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन डीचे पुरेसे प्रमाण असणे आवश्यक आहे. हे पोषक तत्व दातांची रचना मजबूत ठेवतात आणि त्यांना तुटण्यापासून आणि झीज होण्यापासून वाचवतात.
जेव्हा शरीराला दूध, दही, हिरव्या भाज्या आणि सूर्यप्रकाश कमी मिळते तेव्हा दातांची मुळे कमकुवत होतात. याशिवाय, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कॅल्शियम योग्यरित्या शोषले जात नाही, ज्यामुळे दात तुटू लागतात,
कमकुवत दातांचे एक प्रमुख कारण म्हणजे खाण्याच्या वाईट सवयी आणि जास्त गोड पदार्थांचे सेवन. गोड पदार्थ, जंक फूड आणि तळलेले पदार्थ देखील पोषक तत्वांची कमतरता वाढवतात, ज्यामुळे दातांना आवश्यक पोषण मिळत नाही आणि ते कमकुवत होतात.
जास्त दाबाने ब्रश केल्यास हिरड्या सुजू लागतात, ज्यामुळे दातांची पकड कमकुवत होते. तसेच व्यवस्थित ब्रश न केल्याने तोंडात बॅक्टेरिया जमा होतात आणि दात किडायला लागतात. म्हणूनच दिवसातून दोनदा योग्यरित्या ब्रश करणे महत्वाचे आहे.
आहारात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा. गोड पदार्थ आणि जंक फूडपासून दूर रहा आणि सिगारेट किंवा तंबाखू पूर्णपणे टाळा. दर ६ महिन्यांनी एकदा दंतवैद्याकडून तपासणी करून घेणे देखील फायदेशीर आहे.