Mansi Khambe
संसदेचे पावसाळी अधिवेशन नुकतेच सुरू झाले आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याचे कारण सांगत सोमवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला.
मात्र, त्यांच्या या राजीनाम्यामागे त्यांची तब्येत हे एकमेव कारण नाही, असे विरोधी पक्ष तसेच इतरही अनेक राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच एका कार्यक्रमामध्ये जगदीप धनखड यांनी म्हटलं होतं की, ते ऑगस्ट 2027 मध्ये रिटायर होणार आहेत. म्हणूनच, त्यांच्या या राजीनाम्याबाबत शंका-कुशंका व्यक्त करण्यामागे हेही एक कारण आहे.
राष्ट्रपतींनंतर उपराष्ट्रपती हे भारतातील दुसरे सर्वात मोठे संवैधानिक पद आहे. मात्र आता उपराष्ट्रपतींनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढील निवडणुका कधी आणि कशा होतात? असा प्रश्न अनेकांना पडतो.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूक कशा आणि कधी होतात? तसेच त्याची प्रक्रिया काय आहे आणि नवीन उपराष्ट्रपती निवड होईपर्यंत हे पद कोण धारण करते? याबाबतची माहिती जाणून घ्या.
भारतीय संविधानानुसार, देशाचे उपराष्ट्रपती पद खूप महत्वाचे आहे. जेव्हा राष्ट्रपती पद रिक्त असते तेव्हा उपराष्ट्रपती त्याची जबाबदारी स्वीकारतात. इतकेच नाही तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष देखील असतात.
उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या खासदारांद्वारे केली जाते. या निवडणुकीदरम्यान, एका विशेष प्रकारचे मतदान होते, ज्याला एकल हस्तांतरणीय मतदान प्रणाली म्हणतात.
नियमांनुसार, जर देशाचे उपराष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा देतात किंवा काही कारणांमुळे ते पदावर नसतात, तर पदाची रिक्त जागा भरण्यासाठी, त्यांच्या राजीनाम्याच्या 60 दिवसांच्या आत औपचारिक निवडणूक घेणे आवश्यक आहे.
संविधानाच्या नियमांनुसार, या काळात राज्यसभेचे उपसभापती वरिष्ठ सभागृहाचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारतात. सध्या हे पद हरिवंश नारायण सिंह यांच्याकडे आहे.