सकाळ डिजिटल टीम
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचा लढा सध्या मुंबईतील आझाद मैदानावर सुरू आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात मराठा बांधव सहभागी झाले होते.
आंदोलकांनी रस्ते अडवून ठिकठिकाणी ठिय्या मांडला होता, मात्र हायकोर्टाच्या आदेशानंतर आंदोलकांनी शिस्त दाखवत सर्व रस्ते रिकामे केले.
आझाद मैदानात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. गर्दी वाढल्याने आंदोलकांनी बीएमसी आणि सीएसएमटी परिसरातही ठिय्या मांडला होता. त्यामुळे संपूर्ण परिसर ठप्प झाला होता.
चक्का जाम आंदोलनामुळे मुंबईतील वाहतूक विस्कळीत झाली होती. ऑफिसला जाणाऱ्या नोकरदार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत होता.
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान हायकोर्टाने आंदोलकांना मंगळवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले. तसेच, मनोज जरांगे यांच्या प्रकृतीबाबतही राज्य सरकार आणि पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश दिले.
मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आंदोलकांना रस्ते मोकळे करण्याचे आवाहन केले. त्यानंतर आंदोलकांनी गाड्या काढून रस्ते पूर्ण रिकामे केले. ही मराठ्यांच्या शिस्तीची झलक सर्वांसमोर आली.
बीएमसी आणि सीएसएमटी परिसरात आता वाहतूक सुरळीत झाली असून नोकरदार वर्गाला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, महापालिकेच्या सफाई कामगारांनी रस्त्यांची साफसफाईही पूर्ण केली आहे.
आज हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार असून मनोज जरांगे यांनी आपला लढा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.