Pranali Kodre
दहिवडी हे माण तालुक्याचे ठिकाण. माण हे गाव नसून संपूर्ण प्रांताचे नाव आहे. माणदेश दुष्काळी असला तरी इथली संस्कृती समृद्ध आहे.
माण तालुक्यातील म्हसवडमध्ये जुन्या पद्धतीची धाब्याची घरे आजही आपली वास्तुशैली जपून आहेत.
दहिवडीपासून पुढे गोंदवले हे गाव ‘रामदेव संस्थान’ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे जन्मस्थान आणि समाधी आहे.
गोंदवलेकर महाराजांनी नामोपासना आणि अन्नदान यांचा प्रचार केला. समाधीच्या वरील मंदिरात श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि मारुती यांच्या सुंदर मूर्ती आहेत.
मंदिरात भजन-प्रवचनाचे कार्यक्रम नित्य सुरू असतात. दोन प्रशस्त हॉलमध्ये महाप्रसाद व भक्तनिवासाची उत्तम व्यवस्था आहे.
म्हसवड हे धार्मिक केंद्र. येथे सिध्दनाथ (शंकराचे रुप) आणि जोगेश्वरी (पार्वतीचे रुप) यांचे प्राचीन मंदिरे आहेत.
कार्तिक शुध्द प्रतिपदा ते द्वादशी दरम्यान सिध्दनाथ व जोगेश्वरीचा विवाह सोहळा साजरा होतो. मार्गशिर्ष शुध्द प्रतिपदेला यात्रा भरते.
१०० फूट उंच शिखराच्या देवळात सिध्दनाथ हातात त्रिशूल, डमरु, शिगी व नरमुंडमाळ धारण करतो. देवी जोगेश्वरीच्या हातातही तेच आयुधे आहेत.
सातारा-सोलापूर सीमेवर असलेले शिखर शिगणापूर हे शिवपार्वतीचे जागृत स्थळ. चैत्र शुध्द पंचमीला येथे त्यांचा विवाहसोहळा होतो.
माण तालुका हा एकाच वेळी ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध भाग आहे. गोंदवलेपासून शिखर शिगणापूरपर्यंत प्रत्येक स्थळ प्रेरणादायी आहे.