सूरज यादव
मुंबईत वरळीतील दोन सी-फेसिंग डुप्लेस अपार्टमेंटची विक्री तब्बल ६३९ कोटींना झालीय. जीएसटी आणि स्टॅम्प ड्युटीसह याची किंमत ७०० कोटींच्या वर आहे.
भारतातला आजपर्यंतचा हा सर्वात महागडा रेसिडेन्शियल अपार्टमेंटचा व्यवहार ठरलाय. २२ हजार ५७२ चौरस फूट इतकं या अपार्टमेंटचं क्षेत्रफळ आहे.
वरळी सी फेसवर Naman Xana ही ४० मजली इमारत आहे. या इमारतीत ३२ आणि ३५ व्या मजल्यावर हे दोन अल्ट्रा लक्झरी अपार्टमेंट आहेत.
एका फार्मा कंपनीच्या चेअरमन असणाऱ्या लीना गांधी तिवारी यांनी हे फ्लॅट खरेदी केलेत. याची स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटी म्हणून त्यांनी ६३.९ कोटी रुपये भरलेत.
समुद्राचा नजारा आणि वांद्रे, नरिमन पॉइंट जवळ असल्यानं या भागात अपार्टमेंटच्या किंमती जास्त आहेत. तिवारी यांनी घेतलेल्या अपार्टमेंटचा दर २.८३ लाख प्रति चौरस फूट इतका आहे.
दक्षिण मध्य मुंबईत वरळी सी फेसिंगवर असलेला हा भाग लक्झरी रेसिडेन्शियल इमारतींचं केंद्र बनत आहे. देशातील उच्चभ्रू लोकांसाठी हे पसंतीचं ठिकाण बनलंय.
मे महिन्याच्या सुरुवातीला बँकर उदय कोटक यांनी वरळीतील एक अख्खी सी फेसिंग इमारत विकत घेतल्याची चर्चा होती. यासाठी ४०० कोटी रुपये मोजले होते असंही सांगितलं जातंय.