Aarti Badade
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. त्यामुळे १९९३ हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे शताब्दी वर्ष ठरले.
मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील विविध शहरांमध्ये गणेश मंडळांनी शताब्दी वर्षासाठी विशेष तयारी केली होती. अनेक मंडळांनी लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यलढा आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास सांगणारे देखावे उभारले होते.
आजच्या काळातील मोठ्या डीजे आणि साउंड सिस्टिमऐवजी १९९३ च्या मिरवणुकांमध्ये ढोल-ताशा, लेझिम आणि झांज पथकांचा पारंपरिक गजर ऐकायला मिळत असे.
उत्सवाच्या दहा दिवसांत मंडळांकडून व्याख्याने, संगीत कार्यक्रम, लोकनाट्य, भारूड, तमाशा आणि समाजप्रबोधनपर नाटिका आयोजित केल्या जात. त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे व्यासपीठही होता.
त्या काळातील गणेशोत्सवात आजच्या तुलनेत व्यावसायिकतेचा प्रभाव कमी होता. शेजारीपाजारी एकत्र येऊन आरती करणे, प्रसाद वाटणे आणि मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे, यामुळे गणेशोत्सवाला घरगुती आणि आपुलकीचे स्वरूप लाभले होते.
१९९३ मध्ये गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला, २९ सप्टेंबर रोजी झाली. ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या साथीने गणरायाला निरोप देण्यात आला. मात्र, या उत्सवानंतर महाराष्ट्रासमोर एक मोठे संकट उभे ठाकले.
३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे लातूर आणि उस्मानाबाद परिसराला भीषण भूकंपाचा धक्का बसला. किल्लारी परिसरासह अनेक गावांमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. आनंदोत्सवाच्या वातावरणावर या आपत्तीची काळी छाया पसरली.
भूकंपाच्या धक्क्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. अनेक गणेश मंडळांनी नियोजित आनंदाचे कार्यक्रम बाजूला ठेवून भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. उत्सवातून निर्माण झालेली सामाजिक एकजूट मदतकार्यातही दिसून आली.
१९९३चा सार्वजनिक गणेशोत्सव एका बाजूला शताब्दी वर्षाचा ऐतिहासिक उत्सव होता, तर दुसऱ्या बाजूला लातूर भूकंपाच्या दु:खद आठवणींनी जोडलेले वर्ष. संकटाच्या काळातील एकजूट यामुळे हा गणेशोत्सव महाराष्ट्राच्या इतिहासात वेगळे स्थान निर्माण करून गेला.
History of Bhikardas Maruti Temple in Sadashiv Peth
Sakal