सकाळ डिजिटल टीम
जर तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात शांतता अनुभवायची असेल, तर ईशान्य भारत हीच योग्य जागा आहे. इथले निसर्गरम्य वातावरण, हिरव्यागार डोंगररांगा, स्वच्छ नद्या आणि तलाव मनाला शांती देतात. चला जाणून घेऊया ईशान्य भारतातील काही निवडक ठिकाणे…
सिक्कीमची राजधानी असलेले गंगटोक हे निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच! येथे त्सोमगो तलाव, गणेश टोक, नाथू ला पास आणि प्रसिद्ध एम.जी. मार्ग ही खास आकर्षणस्थळे आहेत. दरवर्षी हजारो पर्यटक इथे निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी येतात.
अरुणाचल प्रदेशातील तवांग हे ठिकाण आपल्या सौंदर्यामुळे आणि प्राचीन बौद्ध मठांमुळे प्रसिद्ध आहे. इथे एक गूढ आणि शांत वातावरण आहे, जे आत्मिक समाधान देतं.
मेघालयातील शिलांग शहराला 'भारताचे स्कॉटलंड' असं म्हटलं जातं. येथील शिलांग पीक, वॉर्ड्स लेक, आणि एलिफंट फॉल्स ही ठिकाणं पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत.
आसाममधील माजुली हे जगातील सर्वात मोठं नदी बेट आहे. इथलं शांत, हिरवंगार वातावरण आणि संस्कृतीने नटलेला परिसर तुम्हाला गहिवरून टाकतो.
मेघालयातील चेरापुंजी ही जागा धबधब्यांसाठी आणि अनोख्या लिव्हिंग रूट ब्रिजसाठी ओळखली जाते. तसेच डावकी नदी आणि मावसमाई गुहा हे इथले आकर्षणस्थळे पर्यटकांना मोहून टाकतात.
अरुणाचल प्रदेशातील झिरो व्हॅली ही एक अशी जागा आहे, जिथे निसर्गाच्या प्रत्येक घटकात सौंदर्य आणि शांती सामावलेली आहे. इथे आल्यावर तुम्ही खऱ्या अर्थाने जगापासून तुटलेले आणि स्वतःशी एकरूप झाल्याचा अनुभव घ्याल.
ईशान्य भारताची खास गोष्ट म्हणजे इथली विविधतेने नटलेली संस्कृती. प्रत्येक राज्याची, प्रांताची स्वतःची भाषा, परंपरा आणि जीवनशैली आहे. तुम्ही इथे केवळ निसर्ग अनुभवत नाही, तर संस्कृतीचा अद्वितीय ठेवा देखील पाहता.