संतोष कानडे
पंढरपूर वारीला साधारण ८०० ते १००० वर्षांचा इतिहास आहे. वारीमध्ये काही परंपरा ह्या शेकडो वर्षांपासून अविरतपणे सुरु आहेत.
पालखी सोहळा पुणे जिल्हा ओलांडून सातारा जिल्ह्यात प्रवेश करतो, तेव्हा लोणंद जवळ 'नीरा नृसिंहपूर' येथे नीरा नदीच्या पात्रात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र पादुकांना अत्यंत भक्तीभावाने पवित्र स्नान घातले जाते.
वारीच्या वाटेवर चांदोबाचा लिंब, वेळापूर किंवा वाखरी अशा विस्तीर्ण मैदानांवर रिंगण सोहळे होतात. यामध्ये मानाचा अश्व पालखीला प्रदक्षिणा घालण्यासाठी मोकळा सोडला जातो.
मानाच्या अश्वाच्या पाठीमागे शेकडो वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात धावतात, जो भक्तीचा सर्वोच्च क्षण मानला जातो.
पंढरपूरजवळ आल्यावर 'बाजीराव विहीर' या ठिकाणी वारकरी अचानक भक्तीच्या भरात पंढरीच्या दिशेने धावू लागतात, यालाच 'धावा' म्हणतात
संत तुकाराम महाराजांना याच ठिकाणाहून पहिल्यांदा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे शिखर दिसले होते, या स्मृतीप्रित्यर्थ ही परंपरा आजही जपली जाते.
वारीमध्ये सामील होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची मुख्य ओळख म्हणजे त्याच्या गळ्यात असणारी तुळशीची माळ आणि हातात असणारे टाळ-मृदंग होय.
ही माळ घालणे म्हणजे व्यसनमुक्ती आणि सदाचारी जीवन जगण्याचा अधिकृत संकल्प मानला जातो.
पंढरपुरात पाऊल ठेवताच सर्व वारकरी सर्वप्रथम पवित्र चंद्रभागा नदीच्या पात्रात स्नान करतात आणि मंदिराकडे जाण्यापूर्वी विठ्ठलाला भूतलावर आणणाऱ्या भक्त पुंडलिकाच्या चरणी लीन होतात.
त्यानंतरच मुख्य विठ्ठल दर्शनाची परंपरा पूर्ण होते. दर्शनासाठी दोन-दोन दिवस रांगा असतात. तरीही वारकरी न थकता पांडुरांगाचं दर्शन घेतात.