Mansi Khambe
21 जून रोजी देशभरात 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. यंदा “योगा फॉर वन अर्थ, वन हेल्थ” ही थीम आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाखापट्टनम येथे योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी 3 लाख लोकांसोबत योग केला. याबाबतचे फोटोदेखील समोर आले आहेत.
यावेळी त्यांनी कार्यक्रमात भाषण दिले असून योग लोकांना जगासोबत एकतेकडे घेऊन जातो, जिथे आंतरिक शांती ही एक जागतिक धोरण बनते, असे म्हटले आहे.
हा दिवस मानवतेच्या प्राचीन पद्धतीची सुरुवात आहे. तणाव, अशांतता आणि अस्थिरतेतून जात असलेल्या जगाला योगातून शांततेती दिशा मिळू शकेल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
योग ही एक उत्तम वैयक्तिक शिस्त आहे, ती एक अशी प्रणाली आहे जी लोकांना "मी" पासून "आपण" पर्यंत घेऊन जाते, असेही पंतप्रधानांनी म्हटले.
आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी निरोगी जीवनशैली जगण्याचा संदेश देत असताना लठ्ठपणाच्या विरोधात लढाई लढण्यास सांगितले.
योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपले दिव्यांग मित्र योगशास्त्राचा अभ्यास करतात हे पाहून मला अभिमान वाटतो. शास्त्रज्ञ अवकाशात योग करतात.
लोकांनी जेवणातील तेलाचे प्रमाण १०% कमी करावे. सकस आहाराचे सेवन करावे आणि योगाला एक जनआंदोलन बनवू या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान मोदींनी नंतर स्वयंसेवकांसोबत योगासनं केली. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया अकाऊंटलरही खास पोस्ट केली.
योग हे मानवतेला श्वास घेण्यासाठी, संतुलित होण्यासाठी आणि पुन्हा पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले हे विराम बटण असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
'योग हा केवळ एक व्यायाम नाही तर जीवन जगण्याचा एक मार्ग आहे' अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी योगाचे वर्णन केले.
तसेच पंतप्रधान मोदी म्हणाले, 'सर्वे भवन्तु सुखिनः' ही प्रार्थना म्हणजे मानवतेसाठीचा मार्गदर्शक मंत्र आहे.
आज ११ वर्षांनंतर योग जगभरातील लाखो लोकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे, असे दिसून येत आहे.
योग दिनाच्या निमित्ताने मानवतेसाठी २.० ची सुरुवात करुया. जिथे आंतरिक शांतता हे जागतिक धोरण बनू शकेल, अशी विनंती पंतप्रधानांनी यावेळी केली.