Pranali Kodre
भारत - पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असतानाच आयपीएल २०२५ मधील धरमशाला येथे होणारा पंजाब किंग्स - दिल्ली कॅपिटल्स सामना रद्द करण्यात आला.
ज्यावेळी सामना रद्द झाला त्यावेळी स्टेडियममध्ये २५ हजार प्रेक्षक होते. त्यामुळे परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळावी लागली होती.
हा सामना रद्द झाल्यानंतर पंजाब किंग्सची मालकिण प्रीती झिंटा आणि आयपीएल अध्यक्ष अरुण धुमाल खेळाडूंना स्टेडियममधून बाहेर जाण्यास सांगत होते.
त्यावेळी प्रेक्षकांना तणावाचे कारण न सांगता फ्लडलाईट्समधील बिघाडाचे कारण देण्यात आले होते, जेणे करून प्रेक्षक गोंधळणार नाही आणि चेंगराचेंगरी न होता सुरक्षित स्टेडियममधून बाहेर पडतील, असे धुमाल यांनी सांगितले होते.
आता प्रीती झिंटाने यावर मौन सोडले असून तिने चाहत्यांचे आभार मानले आहेत. याशिवाय तिने जय शाह, अरुण धुमाल, बीसीसीआय आणि पंजाब किंग्सचेही आभार मानले आहेत.
तसेच धरमशाला ते दिल्लीपर्यंत खेळाडूंसाठी ट्रेनची व्यवस्था केल्याबद्दलकिने भारतीय रेल्वेचे आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचेही आभार मानले आहेत.
प्रीतीने चाहत्यांबद्दल म्हटले की 'धरमशाला येथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांचे आभार. घाबरून न जाता चेंगराचेंगरी टाळल्याबद्दल आभार. तुम्ही सर्व रॉकस्टार आहात. मला माफही करा की मी फोटोसाठी नकार दिला, कारण ती काळाची गरज होती. सुरक्षेची खात्री करणे जबाबदारी होती.'