सूरज यादव
काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत निवडणुकी आयोगाच्या कामावर प्रश्न उपस्थित करत अनेक गंभीर आरोप केले. यासाठी राहुल गांधी यांनी अनेक पुरावेसुद्धा जोडले.
राहुल गांधींनी बंगळुरूत एका १० बाय १५ च्या खोलीत ८० नोंदणीकृत मतदार असल्याचा दावा केला. बंगळुरू सेंट्रलमध्ये मुनि रेड्डी गार्डनमध्ये हे घर आहे.
बंगळुरूतील बीएलओकडूनही एका घराच्या पत्त्यावर ८० मतदार नोंद असल्याचं सांगितलं. पण घरमालकाने केलेल्या खुलाशाने खळबळ उडालीय.
घरमालकाने सांगितलं की, प्रवासी मजूर इथं राहतात. त्यांनी घरभाड्याच्या कराराचा वापर मतदान ओळखपत्रासाठी केला. वोटर आयडी मिळाल्यानंतर घर सोडलेल्यांनी नाव मात्र कट केलं नाही.
गेल्या १४ वर्षात कुणीही इथं जास्त काळ राहिलं नाही. नोकरी, बँक खातं, गॅस कनेक्शनसाठी पत्ता लागायचा म्हणून भाडेकरार करून मतदान ओळखपत्र बनवायचे असंही मालकाने सांगितलं.
मतदान ओळखपत्र मिळताच लोक घर सोडायचे. पण त्यांचं मतदार यादीत असलेलं नाव तसंच असायचं. अद्याप त्यांची नावं हटवली नाहीत असं घरमालकाने सांगितलंय.
रेड्डी यांनी सांगितलं की, सध्या या खोलीत बंगाली माणूस राहत आहे. या खोलीचं भाडं दरमहिन्याला ५ हजार रुपये इतकं आहे.
बनावट ओळखपत्रांचं हे प्रकरण नाही, इथं नोंदणी केलेले आता इतरत्र राहतायत. या लहानशा घरात ८० लोक राहू शकत नाहीत आणि राहिले नाहीत असंही घरमालकाने स्पष्ट केलं.