सकाळ डिजिटल टीम
राजगृह हे मुंबई मधील दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे.
बिहारमधील नालंदा इथं बौद्ध राज्यांच्या राजधानीचं नाव राजगृह होतं. बिंबिसार आणि अजातशत्रू या राज्यांची ही राजधानी होती. सम्राट अशोकांनेही इथं भेट दिली होती. त्यावरूनच राजगृह असे नाव देण्यात आले होते.
राजगृहाचे काम पूर्ण होताच बाबासाहेबांनी प्रथम आपल्या लाडक्या रामुस, रमाईस राजगृहामध्ये आणले होते. राजगृह उभा राहिल्या नंतर बाबासाहेबांनी डबक चाळीतील सर्वाना आमंत्रित केले होते.
राजगृह ही पवित्र ऐतिहासिक वास्तू 3 मजली असून आंबेडकरी-बौद्ध आणि दलित जनतेचे एक प्रमुख प्रेरणास्थळ आहे. ही पवित्र वास्तू पाहण्यासाठी अनेक लोक दररोज राजगृहाला भेट देतात.
राजगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जवळजवळ 50 हजार पुस्तकांचा संग्रह केला होता. त्यावेळी ते सर्वात मोठे ग्रंथालय होते. राजगृहाची खरी ओळख ही ज्ञान आणि ऊर्जेचं केंद्र म्हणूनच इतिहासात नोंद आहे.
बाबासाहेबांचे ग्रंथप्रेम जगविख्यात आहे, देश विदेशातील नानाविविध ग्रंथालयांना भेटी देवून, नव नवीन ग्रंथ मागवून त्यांनी आपल्याकडे संग्रही ठेवले. बाबासाहेब जेवढे प्रेम इंग्रजी पुस्तकांवर करत तेवढेच ते मराठी पुस्तकांवर देखील करत.
मराठी व इंग्रजी पुस्तकाबरोबर राजगृहामध्ये गुजराथी, उर्दू फ्रेंच जर्मन, पारशी ग्रंथ असे सर्व मिळून ५०,००० च्या जवळपास राजगृहामध्ये ठासून भरलेले आहेत.
'भारतीय संविधान' आणि 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' असे कित्येक ग्रंथ बाबासाहेबांनी लिहल्याचा हे "राजगृह" साक्षी आहे. म्हणून 'पुस्तकांसाठी घर बांधणारे' बाबासाहेब हे जगातील एकमेव व्यक्ती ठरले.