Shubham Banubakode
आज 27 मे 2025 रोजी भारताचे माजी प्रशिक्षक आणि प्रसिद्ध समालोचक रवि शास्त्री यांनी वयाची 63 वर्षे पूर्ण केली.
रवि शास्त्री 1983 च्या क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य होते. त्यांच्या योगदानाने भारताने ऐतिहासिक विजय मिळवला.
1985 मध्ये बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप कपमध्ये भारताने पाकिस्तानला हरवलं होतं. यावेळी शास्त्री यांना 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स' किताब मिळाला होता.
रवि शास्त्री यांचे नाव अर्जेंटिनाच्या टेनिस स्टार गॅब्रियला सबातिनीसोबत जोडले गेले. अशी चर्चा होती की शास्त्री तिला भेटण्यासाठी अर्जेंटिनाला गेले होते. पण गॅब्रियलाने 'रवि शास्त्री कोण?' असे विचारल्याने हा किस्सा गाजला.
गॅब्रियलाला प्रपोज केल्याच्या अफवांवर शास्त्री यांनी खंडन केले आणि सांगितले की ते इतर कारणांसाठी अर्जेंटिनाला गेले होते. तरीही हा किस्सा क्रिकेटप्रेमींसाठी चर्चेचा विषय ठरला.
शास्त्री यांचे नाव अभिनेत्री अमृता सिंह यांच्यासोबतही जोडले गेले होते. दोघांची छायाचित्रे मॅगझिनच्या मुखपृष्ठावर झळकली, पण 1990 मध्ये शास्त्री यांनी रितु सिंह यांच्याशी लग्न केले, तर अमृताने सैफ अली खानशी लग्न केले.
2008 मध्ये, लग्नाच्या 18 वर्षांनंतर, रवि शास्त्री यांना कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांच्या मुलीचे नाव आहे अलेखा.
1985 मध्ये शास्त्री यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 113 मिनिटांत सर्वात जलद द्विशतक ठोकले. हा विक्रम 33 वर्षे अबाधित राहिला, जो 2017 मध्ये अफगाणिस्तानच्या शफीकउल्लाहने मोडला.
शास्त्री यांनी 1981 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्यांनी 80 कसोटी सामन्यांत 3830 धावा केल्या तसेच 151 विकेट घेतल्या. याशिवाय 150 वनडेत त्यांनी 3108 धावा आणि 129 विकेट घेतल्या.
2007 मध्ये शास्त्री भारतीय संघाचे व्यवस्थापक बनले, 2014-16 मध्ये संचालक आणि 2017 ते 2021 पर्यंत मुख्य प्रशिक्षक राहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने अनेक यश मिळवले.