सकाळ डिजिटल टीम
उपवासाला आपल्याला सतत साबूदाणा खिचडी खावून कंटाळा येतो. आता या उपवासाला बनवा अगदी सोप्या पद्धतीने राताळ्याचे थालीपीठ
उकडलेली रताळी, वरीचं पीठ / भगरीचं पीठ,शिंगाड्याचं पीठ, हिरवी मिरची, भाजलेले शेंगदाण्याचं कूटच, बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेलं आलं, जिरे पूड, सैंधव मीठ,लिंबाचा रस, तेल/तूप
राताळ्याचे थालीपीठ बनवण्याची कृती/ योग्य पद्धत जाणून घ्या.
रताळी स्वच्छ धुऊन कुकरमध्ये २-३ शिट्ट्या करून उकडून घ्यावी. थंड झाल्यावर साल काढून हाताने किंवा काट्याने चांगली कुस्करून घ्यावीत. त्यात गाठी राहू नयेत.
एका मोठ्या भांड्यात कुस्करलेले रताळे, वरीचं/भगरीचं पीठ, शिंगाड्याचं पीठ (घालणार असल्यास), हिरवी मिरची, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, आलं, जिरे पूड आणि सैंधव मीठ घ्यावे.
हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्या. पाण्याचा वापर शक्यतो टाळा, कारण रताळ्यामध्ये आर्द्रता असते. गरज वाटल्यास १-२ चमचे पाणी वापरू शकता, पण पीठ खूप सैल करू नका. थालीपीठाला लिंबाचा हलकासा आंबटपणा आवडत असल्यास लिंबाचा रस घालावा.
एक नॉन-स्टिक तवा मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. एका कॉटनच्या कापडावर किंवा प्लास्टिक शीटवर थोडं पाणी लावून ते ओलं करा. मळलेल्या पीठाचा एक छोटा गोळा घेऊन ओल्या कापडावर हलक्या हाताने थापा. तुम्हाला हव्या त्या आकारात (गोल) थालीपीठ थापून घ्या. खूप जाड किंवा खूप पातळ थापू नका.
गरम तव्यावर थोडं तेल/तूप सोडा. थापलेलं थालीपीठ अलगद ओल्या कापडावरून उचलून तव्यावर टाका. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस सोनेरी रंगावर भाजा. कडेने थोडं तेल/तूप सोडा, जेणेकरून थालीपीठ कुरकुरीत होईल.
गरमागरम पौष्टिक रताळ्याचं थालीपीठ दही, शेंगदाणा चटणी, किंवा उपासाच्या चटणीसोबत तुम्ही सर्व्ह करू शकतात.