Pranali Kodre
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तब्बल ८ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जात आहे, यापूर्वी २०१७ साली शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यात आली होती.
भारतीय संघ २०१७ मध्ये अंतिम सामन्यातही पोहोचला होता, परंतु भारताला पाकिस्तानकडून अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
दरम्यान, २०१७ साली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळलेल्या भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी आता निवृत्तीही घेतली आहे. या निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंवर एक नजर टाकू.
भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने ऑगस्ट २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने जून २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे स्पष्ट केले होते. तो देखील २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा भाग होता.
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू एमएस धोनीही २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळला होता. त्याने ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
भारताचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग देखील २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात होता. त्याने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
भारताचा दिग्गज फिरकीपटू गोलंदाज आर अश्विन याने डिसेंबर २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो देखील २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात होता.
केदार जाधव देखील २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाकडून खेळला होता. त्याने जून २०२४ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.